दिंडोरी – तालुक्यातील जुने धागुर शिवारात एक शेतमजुराच्या चार वर्षीय बालिकेला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली आहे. सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभाग, ग्रामस्थ आणि पोलिस हे सर्वजण बालिका व बिबट्याचा शोध घेत आहेत.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, जुने धागुर येथील एक द्राक्ष उत्पादक शेतकरी माळी यांच्या शेतात काम करण्यासाठी वनोली सुतारपाडा गुजरात येथील काही जण शेतमजुरीस आले आहे. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास शेतावरील शेड मध्ये सदर मजूर स्वयंपाक करत होता. त्याचवेळी एक बिबट्या तेथे आला. बिबट्याने वड कुटुंबातील एक चार वर्षीय बालिकेवर हल्ला केला. तसेच, या बालिकेला घेऊन बिबट्या आळंदी धरणाच्या जंगल दिशेने पळाला. घटनेनंतर बालिकेची आई व इतर नातलगांनी टाहो फोडत तिचा शोध सुरू केला. ग्रामस्थांनी पोलीस व वन प्रशासनास माहिती दिली. पोलीस व वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आहे. मात्र उशिरापर्यंत बालिकेचा शोध लागला नसल्याचे वृत्त आहे.