लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या येवला तालुक्यातील आंबेगाव येथील बापू छबू आव्हाड या तोतया जवानाला अटक करण्यात आली आहे. या फसवणूक प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात बापु छबु आव्हाड व या गुन्ह्यात त्याला साथ देणारे त्याचे साथीदार सत्यजीत भरत कांबळे, राहुल सुमंत गुरव, विशाल सुरेश बाबर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील आंबेगाव येथील बापू छबू आव्हाड याने भारतीय सैन्य दलातील सैनिकांचा गणवेश घालून व खोटे ओळखपत्र दाखवून सैन्य दलातील सरकारी लोकसेवक असल्याचे भासवून भारतीय सैन्य दलात नोकरीस लावून देतो अशी खोटी बतावणी केली. त्यानंतर आंबेगाव येथील गणेश सुकदेव नागरे तसेच आकाश रामनाथ यादव रा.शिरवाडे ता.निफाड या दोघांची मिळून ११ लाख २० हजाराची आर्थिक फसवणूक केली. या दोघांनी आरोपींच्या सांगण्यावरून आरोपींच्या बँक खात्यावर टप्प्याटप्प्याने ११ लाख २० हजार रुपये फोन पे व्दारे पाठवले. मात्र एवढे पैसे दिल्यानंतर देखील फिर्यादीचे आर्मीमध्ये जॉईनिंगचे काम होत नसल्याने फिर्यादीने या बाबत आरोपीस वारंवार विचारणा केली. पण, आरोपींनी फिर्यादीस उडवाउडवीचे उत्तरे दिली व नंतर फिर्यादीचे फोन उचलले नाही या वरून फिर्यादीला व त्यांच्या मित्राला आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यानंर फिर्यादी व त्याचा मित्र आकाश रामनाथ यादव यांनी मिलटरी इटेलिजिन्स दक्षिण कमांड, पुणे येथे बापु छबु आव्हाड व त्याचे साथीदार सत्यजीत भरत कांबळे, राहुल सुमंत गुरव, विशाल सुरेश बाबर यांनी पैसे घेऊन आमची फसवणुक केल्याची तक्रार फोनद्वारे केली होती. या वरून लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील पुढील तपास लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ कोठूळे व पोलिस कर्मचारी करत आहे.