लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा दर प्रश्नावर लासलगाव बाजार समितीत गेल्या दहा तासापासून सुरू असलेले आंदोलन पालकमंत्री दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर अखेर मागे घेण्यात आले. दादा भुसे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सहा मागण्या निवेदनाद्वारे केल्या. या मागण्यांवर लवकरच मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक येत्या आठ दिवसात घेऊ अशी घोषणा मंत्री भुसे यांनी केली. त्यानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. यावेळी मंत्री भुसे भेटण्यासाठी आले असता ते खुर्चीवर न बसता शेतकऱ्यांमध्ये जमिनीवर बसले. आज दिवसभर कांद्याचे लिलाव बंद होते मात्र उद्या नियमित वेळेनुसार कांद्याची लिलाव लासलगाव बाजार समिती होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या आहे सहा मागण्या
१) महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र कांदा महामंडळ स्थापन करावे आणि त्यासाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करावी.
२) कोणत्याही अटी शर्ती शिवाय जानेवारी २०२२ पासून विक्री केलेल्या कांद्याला सरसकट १५०० रुपये अनुदान द्यावे.
३) नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार असलेल्या कांद्याला ३० रुपये प्रति किलो दर द्यावा.
४) जास्तीत जास्त फांदा निर्यात होण्यासाठी कायमस्वरूपी कांदा निर्यात धोरण तयार करावे.
५) कांद्याला कवडीमोल दर मिळाल्यामुळे शेतकरी कर्जाची परतफेड करु शकत नाही म्हणून संपूर्ण पीक कर्ज १०० टक्के माफ करावे.
६) राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्लामध्ये सरकारने कांदा प्रक्रिया उद्योग सुरू करावेत.