मुंबई – कोरोनाच्या काळात परिचारिकांनी केलेल्या अफलातून कार्यासाठी त्यांचा जगभरात गौरव होत आहे. पण आता एका परिचारिकेच्या कल्पकतेनेही जगाचे लक्ष वेधले आहे. या परिचारिकेने व्हॅक्सीनच्या रिकाम्या शिश्यांपासून अतिशय सुरेख असे झुंबर तयार केले आहे. या झुंबरातील लाईट लागतात तेव्हा ते अधिकच खुलून दिसते. एका आंतरराष्ट्रीय वाहिनीने या परिचारिकेची जगाला ओळख करून दिली आहे. या परिचारिकेचे नाव लारा व्हेसिस आहे आणि ती अमेरिकेतील कोलारोडो या भागातील रहिवासी आहे. कचऱ्यातून कलेचा उत्तम नमुना या परिचारिकेने सादर केला आहे. कारण व्हॅक्सीन दिल्यानंतर रिकाम्या झालेल्या शिश्यांचा काहीच उपयोग होत नाही. उलट काही दिवसांनी या शिश्या स्क्रॅपमध्ये जातात आणि त्याचा तसा काहीच उपयोग होत नाही. पण या रिकाम्या बॉटल्सचे काहीतरी करू शकतो, अशी कल्पना लाराला सूचली. त्यानंतर तिने त्यातून एक जबदरस्त असे झुंबर तयार केले. त्यासाठी तिने तारा आणि वायर्सचा वापर केला. लाराने त्यासाठी एक फ्रेम खरेदी केली आणि त्यावर व्हॅक्सीनच्या शिश्यांना लटकविले व त्यात लाईट्स लावले. त्यानंतर सर्व लाईट्स तारेने जोडले. त्यामुळे बटण दाबताच या झुंबराचा झगमगाट होऊ लागला.
म्हणून हा प्रयत्न
कोरोनाच्या काळ अद्याप संपलेला नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात अंधाराचे सावट मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्यातून उजेडाची वाट लोकांना दाखविणे आवश्यक होते. या कल्पनेतून लाराने झुंबर तयार करण्याचा विचार केला. हे झुंबर तयार करून कोरोनाच्या काळात स्वतःला झोकून देणाऱ्या वैद्यकीय सेवकांचा सन्मान करण्याचाही तिचा विचार होता. विशेष म्हणजे लारा याच वर्षी निवृत्त झाली.