*अभ्यास आयोगाने एक वर्षात आपला अहवाल सादर करावा – डॉ. नीलमताई गोऱ्हे*
*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतील स्मारकाच्या कामास व क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यातील स्मारकाच्या कामांना गती देणार – ना. मुंडे*
*मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी डॉ. नीलमताई गोऱ्हे, धनंजय मुंडे व समाजातील नेत्यांची एकत्रित बैठक*
विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील मातंग समाजाचे मागासलेपण ओळखून, त्यांच्या प्रश्न व समस्यांचा अभ्यास करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक योजना आखण्यासाठी 2003 साली नेमण्यात आलेल्या क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाचे पुनर्गठन करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
2003 साली तत्कालीन सरकारने नेमलेल्या या आयोगाला 2008 साली मूर्त स्वरूप प्राप्त झाले खरे परंतु, या आयोगाने सुचवलेल्या 82 शिफारशीपैकी एकही शिफारस प्रत्यक्षात अंमलात आणली गेली नव्हती. म्हणून या आयोगाचे पुनर्गठन करण्यात यावे अशी मागणी माजी आ. पृथ्वीराज साठे व शिष्टमंडळाने केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करत आयोगाचे पुनर्गठन करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी आज झालेल्या बैठकीत दिले असून, या अभ्यास आयोगाने आपला अहवाल एक वर्षात सादर करावा असे विधानपरिषद उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी निर्देशित केले आहे.
मातंग समाजाचे विविध प्रश्न व मागण्यांसंदर्भात मंत्रालयात डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत एका व्हर्च्युअल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे संचालक अनिल अहिरे, सोलापूरचे शिवसेना नेते व माजी मंत्री उत्तम खंगारे, माजी आ. पृथ्वीराज साठे, मा.आ. राजीव आवळे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे विजय डाकले, बाळासाहेब भांडे, सा.न्या. विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, रवींद्र खेबुडकर यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अण्णा भाऊ साठे स्मारक
मुंबईतील घाटकोपर येथील चिरागनगर भागात एस आर ए व म्हाडा च्या संयुक्त विद्यमाने राज्य सरकारच्या माध्यमातुन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीचे काम सुरू आहे. या कामाचा काही दिवसातच एक स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल तसेच या कामास गती देण्यात येईल अशी माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना दिली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातुन आपण केंद्र सरकारला विनंती केलेली असुन, येणाऱ्या अधिवेशन काळात याबाबतचा ठराव करून केंद्र सरकारकडे पाठविण्याचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती ना. मुंडेंनी यावेळी दिली.
स्मारक उभारणी
पुण्यातील क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारक उभारणीच्या कामात भूसंपादन व अन्य अडचणी येत असून उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या मदतीने स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून हे अडसर दूर करण्यात येतील व या स्मारकाच्या उभारणीच्या कामास गती देण्यात येईल असेही या बैठकीत धनंजय मुंडे म्हणाले.
कर्ज मार्यादा ५ लाखांपर्यंत
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी देण्यात येणारी कर्जमार्यादा 5 लाखांपर्यंत वाढविण्यात यावी तसेच समाजातील कृषी विभागाचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कृषी केंद्र उभारणीसाठी अर्थसहाय्य देण्यात यावे याबाबत वित्त विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती एका उपस्थित केलेल्या प्रश्नावर ना. मुंडेंनी दिली.
स्टॅण्ड अप इंडिया कार्यक्रमांतर्गत उद्योग उभारणीसाठी प्रयत्नशील असलेल्या समाजातील तरुणांना एका विशिष्ट बिझनेस मॉड्युल अंतर्गत अर्थसहाय्य मिळावे याबाबतचे एक धोरण राज्य शासन आखत असून कोविड विषयक निर्बंध जसजसे कमी होत जातील, त्यानुसार ही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान अनुसूचित जाती प्रवर्गाला लागू असलेल्या आरक्षणाचे अ,ब,क,ड प्रवर्गांमध्ये वर्गीकरण करावे यासाठीच्या न्यायप्रविष्ट प्रकरणास शासनामार्फत वकील देणे, बार्टीच्या धर्तीवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने संस्था उभारणे आदी विषयांबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
2003 साली नेमण्यात आलेल्या क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाचे पुनर्गठन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आल्यामुळे मातंग समाजातील गावकुसावरचे प्रश्न, समस्या व समाजाची सद्यस्थिती सरकारला अवगत होईल व या आयोगाच्या शिफारसी नुसार नवीन कल्याणकारी योजना आखता येतील. यादृष्टीने आयोगाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय ना मुंडे यांनी जाहीर केल्याबद्दल बैठकीस उपस्थित सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना आदींनी ना. धनंजय मुंडे यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.