नवी दिल्ली – केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीची बातमी मिळताच मध्य प्रदेशातील नागदा या गावी ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. तीन वेळा आमदार, चार वेळा खासदार आणि २०१२ पासून आतापर्यंत राज्यसभेत खासदार राहिलेल्या गेहलोत यांचे सुरुवातीचे जीवन खूपच संघर्षमय होते. त्याविषयीच आपण आज जाणून घेणार आहोत.
मोलमजुरी ते सायकल पंक्चर काढण्याचे काम
आपल्या आयुष्याच्या सुरुवातीला गेहलोत यांनी उपजीविका भागविण्यासाठी कारखान्यात मजुरीच्या कामासह सायकल पंक्चर काढण्याचे कामे केले आहेत. त्यानंतर सक्रियता, साधेपणा आणि सहजपणा या गुणांच्या आधारे त्यांनी राजकीय कारकीर्दीचा प्रवास केला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमधील थावरचंद गेहलोत यांचा जन्म १८ मे १९४८ रोजी नागदाजवळील रुपेटा या गावात झाला. त्यांचे आई-वडील नागदा येथे कापड उद्योगात मजुरी करत होते. गेहलोत १८ वर्षांचे झाल्यानंतर त्यांनीही कापड उद्योगात मजुरीचे काम सुरू केले. त्यादरम्यान त्यांचे शिक्षणही सुरू होते. विक्रम विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. १९७० मध्ये ते भारतीय मजूर संघात सहभागी झाले. मजुरांसाठी त्यांनी अनेक आंदोलनेही केली आहेत. आंदोलनांमध्ये सक्रिय राहिल्याने त्यांची नोकरी गेली. त्यानंतर त्यांनी सायकल पंक्चर काढण्याचे दुकान सुरू केले.










