शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अॅपे रिक्षा आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ७ जण ठार तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालक कंटेनरसह फरार होण्याच्या बेतात होता. मात्र, स्थानिक नागरिकांनी त्याला शिताफीने पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. या अपघातातील मृतांमध्ये २ तरुणी, ३ महिला आणि २ पुरुष यांचा समावेश आहे. जखमींना तातडीने उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
नागपूर-मुंबई महामार्गावर सकाळी ८ वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यात हा भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने अॅपे रिक्षाला जबर धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. रिक्षातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक देण्यापूर्वी कंटेनरने एका मोटारसायकललाही कट मारला. त्यामुळेच या मोटारसायकलवरील तिघे जणही जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, रस्त्यातच एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ७ झाली आहे. जखमींवर जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढम्याची शक्यता वर्तविली जात आहे. कंटेनर चालकाचे नाव दर्शन सिंह (रा. लुधियाणा, पंजाब) असे आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
या अपघातातील मृतांमध्ये रुपाली सागर राठोड (वय ४०, रा. सिन्नर), आत्माराम जम्मानसा नाकोडे (वय ६५, रा. वावी, ता सिन्नर), शैला शिवाजी खरात (वय ४२, रा. श्रीरामपूर), शिवाजी मारुती खरात (वय ५२, रा. श्रीरामपूर), राजाबाई साहेबराव खरात (वय ६०, रा. चांदेकसारे), पूजा नानासाहेब गायकवाड (वय २०, रा. हिंगणवेढे), प्रगती मधुकर होन (वय २०, रा. चांदेकसारे) यांचा समावेश आहे.