कोपरगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उच्च न्यायालय, मुंबई व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांनी घेतलेल्या न्यायिक सेवा परिक्षेच्या निकालात ॲड.कु.तेजस्विनी सयाजीराव कोऱ्हाळे यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून निवड झाली आहे. कोपरगाव न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश – १ सयाजीराव कोऱ्हाळे यांच्या त्या कन्या आहेत. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पदाच्या परिक्षेतील ६३ उमेदवारांची निवड यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात कु.तेजस्विनी सयाजीराव कोऱ्हाळे यांची निवड झाली आहे.
त्यांचे शालेय प्राथमिक शिक्षण न्यायडोंगरी, श्रीरामपूर, जळगाव येथे झाले असून इचलकरंजी येथील इचलकरंजी हायस्कूल (राजवाडा) येथील मराठी शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले आहे. तर औरंगाबाद येथील सरस्वती भुवन महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे आणि माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय येथे विधी शिक्षण पूर्ण झाले आहे. पुणे येथील सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून कॉर्पोरेट लॉ मध्ये पदव्युत्तर (एल.एल.एम.) कायदा पदवी संपादन केली आहे.
पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली व्यवसायास सुरुवात केली. त्यांचे वडिल व पुणे येथील विधिज्ञ गणेश शिरसाट यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.त्यांचे बंधू हे सुद्धा विधी पदव्युत्तर असून नासिक येथे जिल्हा न्यायालयात वकीली व्यवसायात आहेत. त्यांच्या घवघवीत यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Kopargaon Advocate Tejaswini Korhale Judge