कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूरातील धीरेंद्र शास्त्री यांच्या दैवी दरबार चर्चेत असतानाच कोल्हापूरातील महालक्ष्मी महाउत्सव वादात अडकला आहे. या उत्सवाच्या प्रचारासाठी लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवर विविध आजारांवर दिव्य मंत्रांनी दैविक प्रार्थना करण्यात येणार असल्याचा मजुकर प्रकाशित करण्यात आला असून त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आक्षेप नोंदविला आहे. त्याची दखल घेत कोल्हापूर महापालिकेने चौकशी करून कारवाईचा इशारा दिला आहे.
कोल्हापुरात ६ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान महालक्ष्मी महाउत्सव कार्यक्रम होणार आहे. श्री कृष्णगिरी पार्श्व पद्मावती सेवा ट्रस्ट महाराष्ट्र शाखा यांच्यावतीने हा महाउत्सव आयोजित केला आहे. मात्र, हा महाउत्सव आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मंत्रोच्चाराने विविध आजारांवर उपचार करण्याचा दावा या होर्डिंगवर करण्यात आल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली आहे. कार्यक्रमाच्या होर्डिंग्जवर श्री कोल्हापूर महालक्ष्मी असा उल्लेख केल्याने अनेक भाविक कोल्हापुरातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संपर्क करून या कार्यक्रमाची माहिती विचारत आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये मंत्रोच्चाराच्या सहाय्याने आजार बरे केले जातील असे दाखवण्यात आलं आहे. ही शास्त्रीय पद्धत नसून यामुळे चुकीच्या गोष्टी समाजामध्ये पसरू शकतात. कार्यक्रमाची परवानगी घेत असताना अशा पद्धतीचे कोणतेही कागदपत्रे जमा केली नाहीत. त्यामुळे या कार्यक्रमावर कारवाई होऊ शकते, अशा पद्धतीचा इशारा कोल्हापूर महानगरपालिकेनं दिला आहे.
देवस्थानचा संबंध नाही
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे अनेक भाविक या महाउत्सवाबाबत विचारणा करत आहेत. मात्र, या कार्यक्रमाचा आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा कोणताही संबंध नाही असे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले आहे.
Kolhapur Shree Mahalaxmi Mahautsav Controversy KMC Enquiry