कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षण संस्था विद्यादानाचे काम करुन उज्वल भावी पिढी घडवित असल्याने अशा शिक्षण संस्थांना शासन नेहमीच मदत व सहकार्य करते. याच भावनेतून न्यू एज्युकेशन सोसायटीची वरिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याची मागणी विशेष बाब म्हणून मान्य केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.
न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरचा शतक महोत्सवी सांगता समारंभ व शतसंवत्सरी या स्मरणिकेचे प्रकाशन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि त्यांच्या पत्नी सोनलजी शाह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सव समिती व सल्लागार नियामक मंडळाचे कार्याध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांच्यासह संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, माजी विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, कोल्हापूर येथील न्यू एज्युकेशन सोसायटीने गेल्या 100 वर्षात केलेले ज्ञानदानाचे काम कौतुकास्पद आहे. संस्थेची ज्ञानदानाची चळवळ अखंड तेवत रहावी यासाठी न्यू एज्युकेशन सोसायटीने नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित नवीन अभ्यासक्रम सुरू करुन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची सोय उपलब्ध करून द्यावी, त्यास शासन स्तरावरुन आवश्यक ते सहकार्य केले जाईल. न्यू एज्युकेशन सोसायटीने चांगल्या नि:स्वार्थी भावनेने शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे काम केले असल्यामुळेच संस्थेने 100 वर्षाचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. संस्थेचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात नावलौकीक मिळवित आहेत हे संस्थेच्या व भावी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अलौकिक आहे, असे त्यांनी म्हंटले.
विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची भीती असू नये, यासाठी देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामुळे आपणास लहानपणी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या ठिकाणी उपस्थित राहता आले. या कार्यक्रमामुळे लहाणपणीच्या आठवणी जाग्या झाल्या हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता, असे श्री. शिंदे यांनी सांगितले. मागील दोन वर्षात सर्व कार्यक्रम बंद होते, पण आता आपल्या शासनाने सर्व कार्यक्रम करण्यास मान्यता दिली असल्याने विविध सण, उत्सव, समारंभ आपण मोठ्या उत्साहाने व दिमाखात साजरे करत आहोत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.
संकल्पाला कष्टाची जोड देवून यशाला गवसणी घाला – केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचा विद्यार्थ्यांसाठी संदेश
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच जीवनाचे लक्ष निर्धारित करुन हे लक्ष्य साध्य करण्यासाठी संकल्प करावेत. संकल्पाला कष्टाची जोड देवून यशाला गवसणी घाला, असा संदेश विद्यार्थ्यांना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी यावेळी बोलताना दिला.
देशाने सर्व क्षेत्रात क्रांती केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहे. पुढील 25 वर्षात देश जगात सर्व क्षेत्रात अव्वल असेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्रीय गृह मंत्री श्री. शाह म्हणाले, शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होत असतात. या संस्कारातूनच त्यांची चांगली जडण-घडण होते. यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच छोटे-छोटे संकल्प करावेत. एखादी गोष्ट सलग 21 दिवस केल्यास त्याची सवय लागते. हीच गोष्ट 90 दिवस केल्यास त्याची शैली बनते, यासाठी लहाणपणीच छोटे-छोटे संकल्प करुन त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करा. शिक्षण, व्यायाम व योगाला जीवनात महत्वाचे स्थान द्या, असेही श्री. शाह यावेळी बोलतांना म्हणाले.
न्यू एज्युकेशन सोसायटीने 100 वर्षात ज्ञानदानाबरोबरच खेळ, क्रीडा यासह सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमठविला आहे. संस्थेने शिक्षण क्षेत्रात चांगले काम केले असून त्यांचे लाखो विद्यार्थी आज वेगवेळ्या क्षेत्रात काम करीत आहेत. संस्था समाजाप्रती चांगले काम करीत असून माझ्या पत्नीचे शिक्षण या संस्थेत झाले याचा आपणास अभिमान वाटतो. शतक महोत्सवी सांगता समारंभ व शतसंवत्सरी या स्मरणिका प्रकाशन सोहळ्यास आपणास निमंत्रित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह यांनी मनोगत व्यक्त केले. आपण ज्या शाळेत शिकलो, घडलो त्या शाळेच्या समारंभास आपणास उपस्थित राहता आले हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
न्यू एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेमार्फत सध्या १२ वी पर्यंतचे शिक्षण देण्यात येत आहे. संस्थेमार्फत कला, वाणिज्य, विज्ञान, कृषी, वैद्यकीय, विधी शाखेची वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याचा मानस असून यासाठी शासन स्तरावरून मदत मिळावी, अशी अपेक्षा दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सव समिती व सल्लागार नियामक मंडळाचे कार्याध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली.
Kolhapur New Education Society College Soon