कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर ही शाह यांची सासूरवाडी आहे. तसेच, विविध निमित्ताने ते आज कोल्हापूरच्या भेटीवर आहेत. त्यातच आता कोल्हापुरात गाठीभेटींना प्रचंड वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ हे शहा यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थान, कार्यालयासह विविध ठिकाणी सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने छापे टाकले. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणूनही मुश्रीफ कार्यरत आहेत. त्यामुळे ईडीने जिल्हा बँकेच्या शाखांवरही छापे टाकले. त्यानंतर बँकेच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही अटक केली आहे. हे सर्व प्रकरण ताजे असताना आता मुश्रीफ हे अजित पवारांसह शहा यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.
यासंदर्भात मुश्रीफ यांनी म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्हा बँक ही १० ते १५ लाख शेतकऱ्यांची आहे. बँकेवर ईडीचे छापे पडल्याने अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. हे सर्व दूर व्हावेत. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात जिल्हा बँकेचे स्थान अनन्यसाधारण आहे. यासंदर्भातील वस्तुस्थिती केंद्रीय सहकारमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही ही भेट घेणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, काल पुण्यामध्ये बोलताना अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की, सोलापूर, नागपूर आणि कोल्हापूर अशा तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांवर प्रशासक नेमावा लागला. यासंदर्भात मुश्रीफ म्हटले की, कदाचित यापूर्वी बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता, या संदर्भाने शहा यांचे ते वक्तव्य असावे.
Kolhapur NCP Leader Meet Home Minister Amit Shah
Politics