कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोल्हापूर हे शहर धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या देखील महत्त्वाचे आहे. तसेच या शहरातील नागरिक शांतता प्रिय आहेत, असे म्हटले जाते. परंतु काही वेळा किरकोळ कारणावरून वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत देखील होते. दोन जणांमध्ये असेच किरकोळ कारणावरून हाणामारी झाली आणि त्याचे पर्यावसण चक्क हल्ल्यामध्ये झाले.
मुंडीच्या वाट्यावरून
हॉकी स्टेडियम बालाजी पार्क येथे त्र्यंबोली यात्रेनिमित्त मटणाचे वाटे व मुंडी वितरण सुरू होते. सईद नायकवडी- शानेदिवाण हा पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हॉकी स्टेडियम येथे मटणाचा वाटा नेण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला एका मित्राने फोनवरून ओंकार शिंदे व गोट्या परब यांच्यात मुंडीच्या वाट्यावरून जोरदार वादावादी सुरु असल्याचे सांगितले. त्यामुळे सईद हा तत्काळ तेथे गेला. त्याने मध्यस्थी करुन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु गोट्या परब ऐकायला तयार नव्हता. तो सकाळी सात वाजण्याच्या सुमारास निहाल हजारे व अन्य १० ते १२ जणांच्यासोबत पुन्हा म्हाडा कॉलनी येथील सईदच्या घराजवळ गेला. सईद व त्याचा मित्र राहुल लोहार हे पुन्हा वाद सोडविण्याचा प्रयत्न करताना गोट्या व निहाल हे लोहारच्या अंगावर गेले. त्याला सोडवत असतानाच या दोघांनीही सईदवर चाकूहल्ला केला. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सकाळच्या सुमारास हल्ला
हॉकी स्टेडियम बालाजी पार्क येथे त्र्यंबोली यात्रेनिमित्त मटणाचे वाटे व मुंडी वितरण सुरू त्र्यंबोली यात्रेतील मटणाच्या वाट्यातील मुंडी घेण्यावरुन झालेल्या वादावादीतून सईद अन्वर सलीम नायकवडी- शानेदिवाण (वय २९, रा. म्हाडा कॉलनी) याच्यावर चाकू हल्ला झाला. सकाळी हॉकी स्टेडियम परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या सईदला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. जुनाराजवाडा पोलिसांनी निहाल हजारे , गोट्या परब (रा. बालाजी पार्क) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.