रत्नागिरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बारसू रिफायनरी प्रकल्पाचे आंदोलन आता चांगलेच पेटलेले आहे. आज या आंदोलनाने असे काही रुप घेतले की पोलिसांनी परिसरात १४४ कलम लागू केले. हा विषय आता केवळ कोकणापुरता मर्यादित राहिलेला नसून राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी यात उडी घेतली आहे. आंदोलकांचा संयम संपल्याने पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला आहे. तसेच, अश्रूधाराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन पेटल्याचे दिसून येत आहे.
बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना प्रशासनाने तुरुंगात टाकण्याचा प्रकार सुरू केला आहे, अशी तक्रार गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन प्रश्न मांडला होता. त्यानंतर असे काहीही होत नाहीये हे मंत्र्यांनी स्पष्ट केले होते. पण, आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आज आंदोलन केले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
https://twitter.com/supriya_sule/status/1651908982003449856?s=20
या आंदोलनात विनायक राऊत यांच्यासह सहभागी होण्यासाठी स्थानिक महिला व युवक मोठ्या प्रमाणात तिथे आले होते. आंदोलनकर्त्यांनी सर्वेक्षण सुरू असलेल्या ठिकाणी शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. आंदोलकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. एवढ्यावर लोक थांबले नाहीत म्हणून पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. बऱ्याच वेळानंतर पोलिसांना बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना थोपविणे शक्य झाले.
संजय राऊत यांनी शेअर केला व्हिडिओ
https://twitter.com/rautsanjay61/status/1651929587486720003?s=20
आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळली
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. त्यामुळे काहींची प्रकृती ढासळली. त्याचवेळी लाठीचार्ज सुरू असल्यामुळे सगळ्यांची पळापळ झाली. यात अश्रुधुरामुळे लोकांना समोरचे दिसत नव्हते. काहींच्या डोळ्यांना दुखापतही झाली.
शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक
प्रशासनाचा स्थानिकांशी संवाद सुरू आहे. पण तरीही काहींनी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण सुरू केले आहे. सरकार चर्चेसाठी कायमच तयार आहे. शेतकऱ्यांना डावलून आम्ही काहीही करणार नाही. त्यांच्या मनातील शंका दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले (बघा व्हिडिओ)
https://twitter.com/mieknathshinde/status/1651891202265067521?s=20
Kokan Barsu Agitation Police Lathi charge Video