येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोबीला भाव मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या इगतपुरी तालुक्यातील शेतक-याने ५ एकर क्षेत्रातील कोबी पिकावर ट्रॅकरने नांगर फिरविल्याचा घटना ताजी असतांना येवला तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी विजय जेजूरकर यांनी आपल्या शेतात पिकवलेल्या एक एकर कोबी पिकावर रोटर फिरवत पीक नष्ट केले. ज्यावेळेस त्यांच्या कोबीच पिक निघण्यास सुरुवात झाली त्यावेळी बाजारात कोबीला केवळ एक ते दोन रुपये गड्डा असा दर मिळत असल्याने उत्पादन खर्च निघणे मुश्किल झाले. त्यामुळे संतप्त होत त्यांनी आपल्या शेतातील कोबी पिकावर रोटर फिरवत संपूर्ण पिक नष्ट केले. गेल्या काही दिवसां पासून अनेक भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात आता शेतकरी पिकच नष्ट करत आहे.
इगतपुरीत ५ एकर कोबी पिकावर नांगर
पाडळी देशमुख येथील शेतकरी अंबादास खैरे यांनी कोबी लागवडीसाठी प्रती एकर ५० हजार रुपये खर्च केला आहे. एकूण पाच एकर कोबी लागवडीसाठी त्यांचा २.५० लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र कोबी पिकाला केवळ १ रुपये भाव मिळत असल्याने त्यांनी आज शासनाचा निषेध नोंदवीत आपल्या ५ एकर कोबी पिकावर नांगर फिरविला आहे. तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही तर शेतकरी पुन्हा एकदा संपावर जातील असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ
शेतकरी राज्यातील कांदा, द्राक्ष यासह विविध शेतमाल पिकविणारा शेतकरी आपल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे. ही अतिशय दु:खाची बाब आहे. मला राज्यातील शेतकऱ्यांना सांगायचे आहे. आपण कुठल्याही परिस्थित खचून न जाता आत्महत्या करू नये. शासनाला आपली दखल घ्यावीच लागणार आहे. जर शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत केली नाही तर सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ असे अंबादास खैरे यांनी म्हटले आहे.