इंडिया दर्पण विशेष लेखमाला
स्वयंपाकघरातील वनस्पती
– हिंग –
(लॅटिन नाव :- Ferula foetida)
आपल्या स्वयंपाकात हमखास वापरला जाणारा पदार्थ म्हणजेच हिंग. याचे झाड २-३ मि. ऊंच असते.हिंग हा त्या झाडाचा एकप्रकारचा डिंक आहे. हिंग दोन प्रकारचा असतो. १) पांढरा २) काळा १) पांढऱ्या हिंगाच्या वृक्षाचा चीक सुगंधी व हिऱ्याप्रमाणे पांढरा असतो.याला हिराहिंग म्हणतात. २) काळ्या जातीचा हिंग दुर्गंधी असतो. आज आपण हिंगाचे महत्त्व आणि त्याचे गुणधर्म याविषयी जाणून घेऊया….
हिंग कसा मिळवतात?
वसंत ऋतुत हिंगाच्या झाडाच्या मुळाच्या वरच्या भागातील त्वचा चाकूने खरवडतात.या ठिकाणाहून एक डिंकासारखा स्राव निघतो, तो १-२ दिवसात काढून घेतात , त्या ठिकाणी परत थोडा थोडा डिंक तयार होतो. तो रोज काढून घेतात आणि एका कातडी पिशवीत साठवतात. या हिंगात खूप भेसळ केली जाऊ शकते.
खरा हिंग कसा ओळखावा?
पाण्यात टाकल्यावर जो हिंग हळूहळू पांढऱ्या धारेने खाली जातो व पाण्याला दूधी रंग आणतो,भांड्याच्या तळाला अवशेष राहत नाही,तो खरा हिंग होय. शिवाय हिंग जाळला तर पूर्ण जळतो.त्याचा रंग पांढरा,वास तीक्ष्ण आणि चव तिखट असते.
औषधात हिंग वापरतांना तो शुद्ध केला जातो. तो बारीक करून आठ पट पाण्यात विरघळून कपड्यातून गाळून घेतात. नंतर मंद अग्नीवर ते पाणी आटवून हिंग पूड मिळवतात. किंवा आता मुळातच हिंग तसा शुद्ध मिळतो ,त्याची पूड करून ती तूपावर भाजून घेतात.
हिंग हा तिखट ,उष्ण व किंचीत कडू आहे. त्यामुळे तो अगदी कमी प्रमाणात वापरला जातो.
उपयोग :-
१) हिंग हा पाचक ,भूक वाढवणारा आहे. म्हणूनच आपल्या रोजच्या जेवणात त्याचा समावेश असतो.
२)हिंग पोटातील वात,गॅसेस कमी करतो. पोटफुगी असेल तर जेवणाच्या पहिल्या घासात हिंग , सैंधव व जिरेपूड साजूक तूपातून घ्यावी. ह्रद्रोग असलेल्यानी तर रोजच हा योग घ्यावा. अगदी लहान मुले कधी कधी खूप रडतात. अशावेळी त्याच्या बेंबीवर व भोवताली हिंग पाण्यात कालवून गरम करून घालावा. गॅसेस कमी होतात.
३) हिंग जंतुघ्न तसेच कफ कमी करणारा आहे. जुनाट खोकला, डांग्या खोकला यात हिंग किंवा हिंग कर्पूर वटी द्यावी.
४) उष्ण प्रकृताच्या लोकांना हिंग मानवत नाही,अशावेळी तूपात भाजूनच हिंग वापरावा.
५) हिंग वेदनापण कमी करतो. त्यामुळे सूज असलेल्या भागावर त्याचा लेप घालावा. खोकला, धाप लागणे यात पण छातीवर हिंगाचा कोमट लेप करतात.
६) कृमींमध्ये पण हिंग खूप उपयोगी पडतो.गुदातील बारीक जंत मारण्यास हिंगाचा बस्ती करतात.
७) पाळी साफ येत नसेल तर हिंग उपयोगी पडतो. हिंग बाळंतपणात खूप उपयोगी पडतो.हिंगाने गर्भाशयाचे संकोचन होऊन व्यवस्थित रक्तस्राव होतो ,पोट दुखत नाही. बाळंतीणीला पहिले तीन दिवस १/२ चमचा हिंग तूपातून द्यावा.
८)फुफ्फुसाच्या रोगात हिंग खूपच गुणकारी आहे.जुनाट खोकला असल्यास, छातीत कफ झाल्यास हिंगाचा लेप छातीवर घालावा तसेच पोटातून पण द्यावा.याने कफ सुटायला मदत होते.
९) चिमूटभर हिंग १चमचा पाण्यात कालवून त्याचे २ थेंब नाकात सोडल्यास अर्धशीशीमध्ये आराम वाटतो.
१०) दात खूप दुखत असल्यास तिथे हिंग दाबून बसवावा,वेदना कमी होतात.
११) पिसाळलेला कुत्रा चावल्यावर हिंग पाण्यात कालवून प्रथमोपचार म्हणून जखमेवर लावावा.नंतर डॅाक्टर कडेच न्यावे.
१२) पोट साफ होत नसल्यास हिंग ,सैंधव ,एरंडतेल एकत्र करून त्याची वात बनवावी,ही वात गुदद्वारात ठेवावी.यामुळे वात सरून पोट साफ होते.
हिंगाचे पाचक चूर्ण :-
हिराहिंग ( तूपावर भाजलेला) २ चमचे , जिरे चूर्ण १ चमचा ,सैंधव १/२ चमचा , बडीशोप चूर्ण २ चमचे, वाळवलेला आवळा किस चूर्ण २ चमचे,भाजलेला ओवा चूर्ण १/२ चमचा,सुंठ चूर्ण १/२ चमचा सर्व घटक वेगवेगळे काढून ध्यावे. एका मोठ्या पातेल्यात क्रमाने एकत्र करावे. छान एकजीव करावे रोज जेवणानंतर चिमूटभर हे चूर्ण घ्यावे.
डॉ.नीलिमा राजगुरु 9422761801
Kitchen Plants Hing Importance Nutrition by Neelima Rajguru