नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जात्यावरच्या अहिराणी ओव्या… देखणी शोभायात्रा… वाघ्या मुरळी पथक… बोहाड्यातील सोंग घेतलेले आदिवासी… अशा वातावरणात खान्देश महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. येत्या २५ डिसेंबर पर्यंत हा महोत्सव ठक्कर डोम येथे सुरू राहणार आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार सीमा हिरे यांच्यावतीने आयोजित खान्देश महोत्सवाला शोभायात्रेने शुभारंभ करण्यात आला. मुख्य सभामंडपात मान्यवरांच्या हस्ते जाते फिरवून आणि अहिराणी ओव्या गात महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ठक्कर डोम येथे २२ ते २५ डिसेंबर दरम्यान खान्देश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या शुभारंभानिमित्त सिडको परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. आमदार सीमा हिरे आणि महेश हिरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि हवेत फुगे सोडून सिडकोच्या विजयनगर येथून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. वाघ्या मुरळी पथक, बोहाड्यातील सोंग घेतलेले आदिवासी बांधव, सामूहिक नृत्य पथक, ढोल पथक, विविध वेशभूषा केलेली विद्यार्थी, डोंबारी यांचे खेळ, कानबाईची गाणी, लेझिम पथक याशिवाय बैलगाडी, उंट, घोडे आणि चित्ररथ आदींचा समावेश असलेल्या या शोभायात्रेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विजयनगर येथून निघालेली शोभायात्रा महाकाली चौक, पवन नगर, रायगड चौक, त्रिमूर्ती चौक, सिटी सेंटर मॉल मार्गे तीन तासानंतर ठक्कर डोम येथे पोहोचली.
येथील मुख्य सभा मंडपात उद्घाटनाचा मुख्य सोहळा संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि जाते फिरवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जाते फिरवताना नगरसेविका प्रतिभा पवार यांनी अहिराणी भाषेतील जात्यावरची ओवी सादर केल्याने कार्यक्रमात आगळी रंगत भरली गेली. महोत्सवाच्या आयोजिका आमदार सीमा हिरे यांनी प्रस्ताविकातून महोत्सव आयोजनाची उद्दिष्टे आणि संकल्पना स्पष्ट केली. माणसं जोडणारा आणि अहिराणी भाषा, खान्देशी संस्कृती, परंपरा यांची नाशिककरांना ओळख व्हावी म्हणून महोत्सव आयोजित केल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी मनोगत व्यक्त करत महोत्सवाचे कौतुक केले, नगरसेविका प्रतिभा पवार, भाग्यश्री डोमसे, पुष्पा आव्हाड, माधुरी बोलकर, छाया देवांग, इंदुमती नागरे, भगवान दोंदे, श्याम बडोदे, राकेश दोंदे, योगेश हिरे आदी उपस्थित होते. महोत्सवाच्या संयोजिका रश्मी हिरे बेंडाळे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून आभार मानले. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटन सोहळ्यानंतर अहिराणी साहित्य संमेलन आणि बहुभाषिक कवी संमेलन संपन्न झाले. हे संमेलन दिवंगत कवी कमलाकर देसले यांना समर्पित करण्यात आले होते.
https://twitter.com/MlaSeemaHiray/status/1605063422877368320?s=20&t=WCU_kHAm_cNsT288tgqHaw
Khandesh Mahotsav Start in Nashik Today