नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची बाब निदर्शनास येत असून भिवंडी येथुन नाशिक शहर व मालेगांवसाठी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे समोर येत आहे. तसेच नाशिक शहरात हुक्का पार्लर देखील मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत भाषण करताना केली.
यावेळी आ. फरांदे यांनी मखमलाबाद रस्त्यालगत व गंगापूर रोड वर काही हॉटेल व कॉफे हे अंमली पदार्थांचे अडडे झालेले आहे. पान टपरीवर अंमली पदार्थ रात्री २ पर्यंत खुलेआम विकले जात आहेत असे नमूद करताना शहरातील काही शाळांमधील मुले देखील व्यसनाधीन होत असून ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले.. यापूर्वी देखील स्थानिक पोलीस प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली असताना देखील पोलीस प्रशासनाकडून याबाबत कारवाई झाली नसल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी नमूद केले. नाशिक शहरात हुक्का पार्लर देखील मोठ्या प्रमाणावर सुरू असुन सदर ठिकाणी पाण्याच्या ऐवजी बियरचा वापर केला जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नशा होत असते. त्याचप्रमाणे जुगाराचे ( बॉल गेम) या सारखे अनैतीक खेळाचे अड्डे खुलेपणाने मुंबई नाका परीसरात सुरू आहे. या अनैतिक धंद्यांकडे पोलीस प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष बाबत आमदार देवयानी फरांदे यांनी नाराजी व्यक्त केली. या अमली पदार्थ व बेकायदेशीर धंद्यामुळे नाशिक शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढलेले आहे. अंमली पदार्थांच्या विक्री मुळे व हुक्का पार्लर मुळे मोठ्या प्रमाणावर नाशिक शहरातील युवक व्यसनाधिन होत आहे. त्यामुळे नाशिक शहरातील अंमली पदार्थांची विक्री थांबविणे कामी तसेच भिवंडी येथून मालेगांव व नाशिक येथे होणारी अंमली पदार्थांची वाहतूक थांबविणे तसेच हुक्का पार्लरवर कारवाई करणे कामी तत्काळ कारवाई करण्याची विनंती आमदार देवयानी फरांदे यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत शासनाने दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.