नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरातील तोफखाना केंद्रीय विद्यालयात सोमवार,( 12 सप्टेंबर) पासून भारत स्काऊट्स अँड गाईड्स अंतर्गत गाईड साठीचे तीन दिवसीय परीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मुंबई विभागातील 13 शाळांचे एकूण 64 गाईड्स सहभागी होत आहेत.
सोमवारी सकाळी शिबिराच्या शुभारंभ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आयुक्त तथा केंद्रीय विद्यालय एअर फोर्स स्टेशन देवळालीच्या प्राचार्या श्रीमती विमला श्रीनिवासन या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे श्रीमती श्रीनिवासन, प्राचार्य श्री देवेंद्र कुमार ओलावत, शिबिर प्रभारी एलओसी श्रीमती श्रुती सूद आणि सर्व पाहुण्यांनी स्काउट गाईड चळवळीचे प्रणेते श्री बॅडेन पॉवेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. केंद्रीय विद्यालय औरंगाबादच्या गाईड्सनी स्वागत गीताचे सुंदर सादरीकरण केले. प्राचार्य देवेंद्र कुमार ओलावत यांनी प्रमुख पाहुण्यांचे छोटे रोप देवून स्वागत केले तर श्रीमती संजीवनी गावीत यांनी स्कार्फ प्रदान करीत पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी प्रमुख पाहुण्या श्रीमती श्रीनिवासन म्हणाल्या की, स्काऊट गाईड ही चळवळ आहे. ही चळवळ सर्जनशील गुण विकसित करायला शिकवते. गाईड्स नेहमी तत्पर आणि उत्साही असतात. तुमची सक्रियता दाखवत तुम्हाला चाचणी शिबिरात मोठ्या उत्साहाने सहभागी व्हायचे आहे. राष्ट्रीय कार्यासाठी तुमचे योगदानही तुम्हाला जाणीवपूर्वक सुनिश्चित करावे लागेल.
या शिबिरासाठी नाशिकचे एअरफोर्स स्टेशन ओझर, एअरफोर्स स्टेशन देवलाली, क्र. 1 देवलाली, आयएसपी आणि आयोजक तोफखाना केंद्रीय विद्यालय, अहमदनगर केव्ही क्रमांक 1, व्हीआरडीई, एमआयआरसी, आयुध निर्माणी भुसावळ, आयुध निर्माणी वरणगाव, मध्य रेल्वे मनमाड, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, औरंगाबाद छावणी शिफ्ट 1 व 2, सिआरपीएफ मुदखेड, मध्य रेल्वे मनमाड, वाशिम, धुळे इत्यादि शहरातील शाळांच्या गाईड्सची चाचणी घेऊन अंशदान केले जाईल.
या परीक्षण शिबीरासाठी औरंगाबाद केंद्रीय विद्यालयातील श्रीमती शाहीन तबस्सुम, मनमाड येथील श्रीमती व्ही.एन.भारती, धुलिया येथील सौ. सुवर्णा सनेर हे परिक्षण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.नंदिनी भगत, सौ.संजीवनी गावित, श्री.आरिफ बेग, श्री.संतोष खडगीर, श्री.ज्ञानेश्वर सरताळे, श्री.ओंकार काकुस्ते, सौ. खुशनुमा आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री.आरिफ बेग यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ सुवर्णा सनेर यांनी मांडले.
Kendriya Vidyalay Bharat Scout Guide Camp