नवी दिल्ली – कोविड महामारीचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र तसेच केरळ सरकार करत असलेल्या उपाययोजनांचा आज केंद्रीय गृहसचिवांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला. या बैठकीत, केरळ आणि महाराष्ट्रातील एकूणच कोविड व्यवस्थापनावर चर्चा करण्यात आली. संसर्ग पसरू नये यासाठी दोन्ही सरकारांनी केलेल्या उपाययोजना केंद्रीय गृहसचिवांनी जाणून घेतल्या. कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. या दृष्टीने, जिथे संसर्ग अधिक आहे, अशा भौगोलिक क्षेत्रात, सरकारने पुरेशी कार्यवाही करायला हवी. जसे की रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा माग काढून त्यांची तपासणी, लसीकरण मोहीम आणि कोविड विषयक प्रतिबंधक नियमांचे पालन करवून घेणे, आवश्यक आहे, असे ते म्हणाले. जिथे रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर अधिक आहे, अशा भागात राज्य सरकारांनी रात्रीची संचारबंदी लावण्याचा विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
राज्य सरकारांनी आपली लसीकरण मोहीम सुरूच ठेवावी असे सांगत, त्यांना जर अधिक लसींची गरज असेल, तर त्यासाठी शक्य तेवढ्या लसींचा पुरवठा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, त्याचवेळी, पाठवण्यात आलेल्या सर्व मात्रा लाभार्थीना दिल्या जातील, यासाठी दक्ष राहावे अशी सूचनाही त्यांनी केली. लसीकरण मोहिमेदरम्यानही कोविडविषयक नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले. तसेच, आगामी सण-उत्सवांचा काळ लक्षात घेता, सार्वजनिक समारंभ टाळले जावेत, असे आवाहन त्यांनी केले. दोन्ही राज्यात, जिथे रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर जास्त आहे, तिथे चाचण्यांचा वेगही वाढवायला हवा, असा सल्लाही यावेळी देण्यात आला. कोविडचे संक्रमण पसरणार नाही, यासाठी पुढचे काही महीने सतर्क राहून दक्षता घेतली जावी आणि संक्रमण साखळी तोडण्यासाठी अधिक प्रभावीपणे प्रयत्न करावेत, अशी स्पष्ट सूचना गृहसचिवांनी दिली.
या बैठकीत, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य), व्ही के पॉल, आरोग्य विभागाचे सचिव, राष्ट्रीय संसर्गजन्य आजारविषयक केंद्राचे संचालक तसेच, केरळ आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव व पोलिस महासंचालक सहभागी झाले होते.