इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. केदारनाथपासून २ किमी अंतरावर असलेल्या गरुडछट्टीमध्ये हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. एका खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये ६ जण होते आणि या सर्वांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातात पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गुप्तकाशीहून केदारनाथला जात असताना हा अपघात झाला. अपघातस्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देणार आहेत. त्यापूर्वीची ही मोठी दुर्घटना घडली आहे.
पोलिसांसह राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)ची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. नागरी आणि विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही ट्विट करून या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळणे दुर्दैवी असल्याचे ट्विट केंद्रीय मंत्र्यांनी केले आहे. आम्ही राज्य सरकारच्या संपर्कात असून अपघातातील नुकसानीचे मूल्यांकन करत आहोत. आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
हेलिकॉप्टर अपघात कशामुळे झाला? ही माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. हा अपघात खराब हवामानामुळे झाला की हेलिकॉप्टरमधील काही तांत्रिक बिघाडामुळे झाला याचा आता तपास केला जाणार आहे. फाटा येथून पर्यटकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर केदारनाथमध्ये कोसळल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाचे पथक तेथे मदत आणि बचाव कार्यासाठी गेले आहे. एका मीडिया वाहिनीने एका प्रत्यक्षदर्शीशी संवाद साधताना सांगितले की, तेथील हवामान खराब होते. तिथे सतत पाऊस पडत असतो. या अपघातानंतर एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये धुके आहे. काही लोक डोंगरावर उभे असलेलेही दिसतात.
खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरने परतण्याचा प्रयत्न करत असताना जंगलचट्टीजवळील दरीत हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातादरम्यान आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत आहेत. या अपघातात हेलिकॉप्टर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. हेलिकॉप्टर अपघाताबाबत जे व्हिडिओ समोर आले आहेत त्यात हेलिकॉप्टरचे अवशेषही दिसत आहेत.
https://twitter.com/ANI/status/1582262625114546177?s=20&t=rpocUDMpsQI0u26bIFwDKA
Kedarnath Helicopter Crash 6 Person Killed
Accident Uttarakhand