इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. बिग बी अमिताभ बच्चन आपल्या सूत्रसंचालनाने हा कार्यक्रम अधिकच रंजक करतात. या कार्यक्रमात सहभागी होणे, हे जवळपास प्रत्येकाचे स्वप्न असते. यात सहभागी होऊन करोडपती होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. सोप्या प्रश्नांनी झालेला हा प्रवास नंतर अधिक कठीण होत जातो. त्यामुळे सर्वच स्पर्धकांना शेवटचा टप्पा गाठता येत नाही. तरीही तिथपर्यंत जाऊन परत येणे ही खूप मोठी गोष्ट आहे. असंच काहीसं मंगळवारच्या भागात घडलं आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक असलेले महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस होता आणि या शाश्वत गोएल हा हॉटसीटवर होता. शाश्वतने सोमवारच्या भागामध्ये ७५ लाखांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे मंगळवारी त्याला पहिलाच प्रश्न हा एक कोटींचा विचारण्यात आला. विशेष म्हणजे एक कोटींच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देत शाश्वत या पर्वातील दुसरा करोडपती ठरला. त्यातही त्याने साडेसात कोटींच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त करत त्या प्रश्नाचं उत्तरही दिलं पण ते उत्तर चुकलं आणि तो एक कोटींऐवजी केवळ ७५ लाख रुपये घरी घेऊन गेला.
उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील भितरीमध्ये असणारा स्तंभ हा कोणत्या राजवटीमधील राजांची माहिती सांगण्यासाठी एक चांगला स्त्रोत असल्याचं मानलं जातं असा प्रश्न शाश्वतला एक कोटींसाठी विचारण्यात आला होता. यासाठी पर्याय म्हणून शिशुनाग, गुप्त, नंद आणि मौर्य असे चार पर्याय देण्यात आले होते. बराच विचार करुन शाश्वतने गुप्त असं उत्तर दिलं. हे उत्तर बरोबर असल्याचं सांगताना अमिताभ यांनीच येऊन शाश्वतला मिठी मारली.
यानंतरचा साडेसात कोटींचा प्रश्न हा भारत ब्रिटीशांच्या ताब्यात जाण्यासंदर्भातील होता. भारतामध्ये तैनात झालेली पहिली ब्रिटीश सैन्याची तुकडी म्हणून कोणत्या तुकडीला ‘प्राइम इन इंडिस’ असं नाव देण्यात आलं होतं? असा प्रश्न सात कोटींसाठी विचारण्यात आला. शाश्वतला या प्रश्नासाठी कोणतीही लाइफलाइन वापरता येणार नव्हती. मात्र त्याने अमिताभ यांच्याकडून आपलं उत्तर चुकलं तर नेमके किती रुपये आपल्याला मिळतील असं विचारलं. या प्रश्नावर अमिताभ यांनी ७५ लाख असं उत्तर दिलं. त्यामुळेच उत्तर चुकलं तर २५ लाखांचा फटका बसेल मात्र बरोबर आलं तर थेट साडेसात कोटी रुपये जिंकू असं म्हणत शाश्वतने आपण या प्रश्नाचं उत्तर देणार असं सांगितलं आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.
या प्रश्नाला
ए) ४१ वी (वेल्च) रेजिमेंट ऑफ फूट
बी) पहिली कोल्डस्ट्रीम गार्ड
सी) पाचवी लाइट इफ्रेंट्री
डी) ३९ वी रेजिमेंट ऑफ फूट
असे पर्याय देण्यात आले होते.
शाश्वतने बराच वेळ विचार करुन ‘डी’ असं उत्तर दिलं. त्यावर अमिताभ यांनी लॉक करू का असं विचारलं असता शाश्वतने आपलं उत्तर बदलून ‘ए’ पर्याय निवडला. ‘४१ वी (वेल्च) रेजिमेंट ऑफ फूट’ लॉक करा असं शाश्वतने सांगितलं आणि त्यानंतर अमिताभ यांनी हे उत्तर चुकीचं असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे, या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे पर्याय ‘डी’ ‘३९ वी रेजिमेंट ऑफ फूट’ होतं.
ज्या पद्धतीने शाश्वत खेळला ते पाहून अमिताभही फारच प्रभावित झाल्याचं दिसून आलं. आपल्या आईच्या प्रोत्साहनामुळे आपण इथपर्यंत पोहचल्याचं सांगत शाश्वत भावूक झाला. शाश्वतच्या आईचं करोनाच्या कालावधीमध्ये निधन झालं. त्याने कम्पॅनियन म्हणून आईच्या जागी कोणालाच आणलं नव्हतं. त्याच्या दिवंगत आईसाठी खुर्ची रिकामी सोडण्यात आलेली. ७५ लाखांचा चेक घेतल्यानंतर सेटवरुन जाण्याआधी तो त्या सीटजवळ जाऊन रडल्याचंही यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळालं.
KBC14 Question for 7.5 Crore Wrong Answer by Contestant
Amitabh Bachhan Kaun Banega Carorepati