नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका व सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवि कालिदास नाट्यमंदिरात आज मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने निमंत्रितांचे कवी संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास गंगाधर अहिरे, प्रशांत केंदळे, संदिप जगताप, राजेंद्र उगले, कविता गायधनी, तन्वी अमीत, सुरेश पवार, विशाल टर्ले, गोरख पालवे, विष्णु थोरे, रविंद्र देवरे, देविदास चौधरी, संतोष हुदलीकर, सुभाष सबनीस, राजेंद्र सोमवंशी आदी कवी उपस्थित होते. या कवींनी या संमेलनात रंग भरले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व कवींनी कवी संमेलनात सहभागी होऊन राजकिय, सामाजिक, निसर्ग अशा विविध विषयांवर कविता सादर केल्या. यावेळी सर्व कवींचा मराठी भाषा गौरव दिन निमित्त स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास उपायुक्त रमेश काळे, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, नितिन मुंडावरे, गणेश मिसाळ, राजश्री अहिरराव, यांच्यासह सार्वजनिक वाचनालय, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, महसुल, जिल्हा परिषद, महापालिकेतील अधिकारी, नागरीक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कवयित्री तन्वी अमित यांनी केले.
मानवी जीवन मुल्यांचा ठाव घेणारी भाषा म्हणजे कविता: ऐश्वर्य पाटेकर
कविता निर्मिती ही कठिण प्रक्रिया आहे. मानवी जीवनातील हरवलेल्या मुल्यांचा ठाव घेण्याचे काम कवितेची भाषा करत असते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ऐश्वर्य पाटेकर यांनी केले. ते आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित निमंत्रितांचे कवी संमेलन या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. कवि ऐश्वर्य पाटेकर म्हणाले, बिघडलेल्या समाजव्यवस्थेला सुधारण्याचे काम कवितारुपी शब्द करत असतात. तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपुर्वी केलेले लिखाण आजही तळपत्या शस्त्राप्रमाणे समाजाला प्रभावित करणारे आहे. कवि कुसुमाग्रजांनी देखील कवितेकडे अतिशय गांभीर्याने पाहिले आहे. पुरस्कार हे भिंतीवर लावण्यासाठी असतात, परंतु कवितेतला शब्द हा वाचकांच्या काळजाला भिडण्यासाठी तो कवीच्या मनातून उस्फुर्तपणे येत असतो. कविता करतांना त्या कवितेची परंपरा समजून घेणेदेखील आवश्यक आहे. आजच्या काळात मराठी भाषा गौरव दिन हा एका कवीचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो, हा सर्व कवींचा सन्मान आहे. असे सांगून पाटेकर यांनी भाकर आणि आई ही कविता यावेळी सादर केली.