नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी)च्या जवानांना घेऊन जाणारी बस चंदनवाडी परिसरात प्रचंड खोल दरीत कोसळली आहे. बसमध्ये ३९ जवान होते. आताच हाती आलेल्या वृत्तानुसार ६ जवानांचा मृत्यू झाला आहे तर ३० पेक्षा अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत. अनेक जवानांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमी जवानांना विमानाने श्रीनगर येथील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये ३९ जवान होते. त्यापैकी ३७ आयटीबीपीचे आणि २ जम्मू-काश्मीर पोलिसांचे जवान होते. बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे समजते. बसमधील सैनिक अमरनाथ यात्रेच्या ड्युटीवरून परतत होते. आयटीबीपी कमांडोंना घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे जेणेकरुन बचावकार्य जलद करता येईल. तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की नदीजवळ बसचा केवळ सांगाडा दिसून येत आहे. बसचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. रस्त्यावरुन बस थेट शेकडो फूट खोल दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अपघाताची गंभीर दखल विविध पातळ्यांवर घेण्यात आली आहे.
https://twitter.com/Hindustan_Meri1/status/1559431613502525440?s=20&t=jWfNNJqGwwhuNLkuCaeAHg
गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात एक मिनी बस रस्त्यावरून घसरून दरीत कोसळली, त्यात १८ जण जखमी झाले. बसमधील बहुतांश विद्यार्थी होते. मिनीबस बारमिनहून उधमपूरच्या दिशेने जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि घोर्डी गावाजवळ बस दरीत कोसळली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ११ विद्यार्थ्यांसह १८ जखमींना उधमपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
(ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. सविस्तर माहितीसाठी हे पेज रिफ्रेश करावे)
Kashmir ITBP Soldier Bus Major Accident