मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मुस्लिम समाजाच्या मोठ्या विरोधामुळे वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिराजवळील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम थांबविण्यात आले आहे. सर्वेक्षणाचे काम सोमवारी सुरू राहणार आहे. या सर्वेक्षणादरम्यान मोठे खुलासे झाले आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, सर्वेक्षण आणि व्हिडिओग्राफी सुरू असताना ज्ञानवापी-श्रृंगार गौरी परिसरात ज्ञानवापी मशिदीजवळ दोन स्वस्तिकाचे चिन्ह दिसून आले आहेत. परंतु सर्वेक्षणाचा अहवाल आधी न्यायालयात सादर केला जाणार असल्याने अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आले नाही.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या व्हिडिओग्राफर्सनी एका वाहिनीला सांगितले, की सर्वेक्षणादरम्यान त्यांना मशिदीच्या बाहेर दोन अस्पष्ट परंतु सुवाच्च स्वस्तिक सापडले आहेत. हे स्वस्तिक प्राचीन काळात बनविण्यात आले होते.
न्यायालयाने नियुक्त केलेल्या पथकाला ज्ञानवापी मशिदीमध्ये प्रवेश करण्यास रोखल्यामुळे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. असे कोणते सत्य उघड होण्यापासून रोखले जात आहे? या प्रकरणी मुस्लिम समाजात इतकी भीती का आहे?, असा प्रश्न आलोक कुमार यांनी उपस्थित केला आहे. सर्वेक्षणात अडथळा निर्माण करणे राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. एका न्यायालयाने मशिदीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. त्याविरुद्ध मुस्लिम समाजाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने सर्वेक्षण थांबविण्याचे आदेश न देता त्यांची याचिका फेटाळून लावली, मग सर्वेक्षण का रोखले जात आहे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
आलोक कुमार सांगतात, ते १९७४ साली काशी विश्वनाथ येथे गेले होते. त्या वेळी भाविक श्रृंगार गौरीचे दर्शन करत होते आणि कुंकू लावत होते. कारण ते रस्त्यावर आहे. ते मशिदीच्या मागच्या बाजूला आहे. त्यामुळे ते बंद का करावे? ज्ञानवापी मशिदीला मंदिर बनवावे अशी मागणी याचिकेत न करता फक्त श्रृंगार गौरीमध्ये काही वर्षांपूर्वीपर्यंत भाविक दर्शन करत होते. ते पुन्हा दर्शनासाठी खुले करण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली.
वाराणसीमधील अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती सांगतात, वादग्रस्त परिसरातील सर्वेक्षण पहिल्यांदा होत नाहीय. १९३७ साली वाराणसीचे तत्कालीन दिवाणी न्यायाधीश एस. बी. सिंह यांनी एकदा नव्हे, तर दोन वेळा ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात स्वतः निरीक्षण केले होते. संबंधित याचिकेच्या सुनावणीच्या पूर्वी एकदा आणि निकाल सुनावण्यापूर्वी दुसऱ्यांदा निरीक्षण केले होते. त्याच खटल्यात इंग्रजांनी डॉ. परमात्मा सरण आणि डॉ. ए.एस. अल्टेकर या दोन इतिहासकारांना साक्षीदार म्हणून सादर केले होते. या दोन्ही इतिहासकारांनी ज्ञानवापी मशिद परिसर, मशिदीच्या खालील तळघर आणि पश्चिम भिंतीत प्राचीन मंदिराच्या भग्नावशेषांचे सविस्तर सर्वेक्षण आणि अभ्यास केला होता.
या दोन्ही इतिहासकारांच्या साक्ष देण्यावर मुस्लिम समाजाने आक्षेप घेतला होता. तज्ज्ञांची गरज असेल तर सरकारी तज्ज्ञांऐवजी न्यायालयाने स्वतः तज्ज्ञांना नियुक्त करावे, असे त्यांचे म्हणणे होते. त्या वेळी जर हे स्वीकारले होते, तर आज न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या पथकावर का आक्षेप घेतला जात आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे