इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कनार्टकातील काँग्रेसच्या विजयामध्ये त्यांनी दिलेल्या पाच वचनांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. या पाच वचनांमध्ये कर्नाटकातील सर्व महिलांना मोफत बस प्रवास, घरातील महिला प्रमुखाला दर महिन्याला २ हजार रुपये या घोषणांचा समावेश आहे. पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत या ५ आश्वसनांची पूर्ती करण्यात आली आहे. तशी माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली आहे.
कनार्टकमधील विजयाने काँग्रेसमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. या एकहाती विजयामागे काँग्रेसने दिलेल्या पाच घोषणांचा समावेश आहे. यानुसार गृहलक्ष्मी योलनेंतर्गत घरातील महिला प्रमुखाला दर महिन्याला २ हजार रुपये देण्यात येणार आहे. युवानिधी अंतर्गत कर्नाटकातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. यानुसार दोन वर्षांसाठी कर्नाटकातील बेरोजगार पदवीधारकांना ३ हजार रुपये प्रति महिना आणि बेरोजगार डिप्लोमाधारकांना १५०० रुपये प्रति महिना जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, काँग्रेसने २ लाख सरकारी नोकऱ्या आणि १० लाख खासगी नोकऱ्या निर्माण करण्याचेही आश्वासन दिले आहे. अन्नभाग्य या योजनेनुसार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दर महिन्याला प्रति व्यक्ती १० किलो तांदूळ दिले जाईल. गृह ज्योती योजनेंतर्गत कर्नाटकातील प्रत्येक कुटुंबाला २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येईल. तर सखी योजनेनुसार कर्नाटकातील सर्व महिलांना मोफत बस प्रवासाचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे. या पाच आश्वासनांमुळे कर्नाटकातील जनेतेने विश्वास टाकल्याचे बोलण्यात येत आहे.
काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पक्षासाठी लकी ठरले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारून काही महिने लोटत नाही तोच त्यांनी काँग्रेसला कर्नाटकात मोठा विजय मिळवून दिला आहे. याबद्दल खर्गे यांनी जनतेचे आभार मानले आहेत. ते म्हणाले,‘हा खरोखर कर्नाटकातील जनतेचा विजय आहे. त्यांनी त्यांच्या प्रगतीशील भविष्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी मतदान केले आहे. आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही हात जोडून त्यांचे आभार मानतो. काँग्रेस पक्ष पाचही आश्वासनांची अंमलबजावणी करणार आहे. जय कर्नाटक! जय हिंद!’
शपथविधीनंतर लगेच बैठक
कर्नाटकच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तातडीने मंत्रिमंडळ बैठक घेतली. याच बैठकीत काँग्रेसच्या प्रमुख ५ घोषणांचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यास मंजुरी देण्यात आली. या पाचही घोषणांची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
जो हम कहते हैं, उसे पूरा करते हैं!
पहला दिन, पहली कैबिनेट मीटिंग – कर्नाटक को दी हुई हमारी 5 गारंटी को मंज़ूरी मिल चुकी है! pic.twitter.com/muQF6MKRTd
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 20, 2023
Karnataka First Cabinet Meeting Decisions