नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समाजातील अंधश्रद्धा दुर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करत असतात. पण राजकिय व्यक्ती ज्योतिषी, बुवा-बाबा यांच्या आहारी गेलेले असतात. त्यांच्या सल्ल्यानुसार ते निवडणुकीत फाॅर्म भरतात. काही राजकीय लोक तर त्यांच्या सल्ल्यानेच प्रत्येक मोठे कार्य करत असतात. मात्र एका कार्यकर्ता असलेल्या राजकीय व्यक्तीने अशुभ समजल्या जाणाऱ्या राहु काळात फाॅर्म भरला. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या प्रचारसभा स्मशानभूमीत घेतल्या अन ते निवडूनही आले. या बाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
कर्नाटक राज्य विधानसभेची निवडणूक नुकतीच झाली.महाराष्ट्राच्या सीमेलगत बेळगावच्या यमकनमर्डी या मतदार संघातून सतीश जारकीहोळी हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूकीसाठी उभे होते. ते कर्नाटक मधील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आहे. अनेक वर्ष मंत्रिमंडळात ते अनेक खात्यांचे मंत्री राहिलेले आहेत. ते पुरोगामी विचारांचे असुन अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते आहेत.समाजातील अंधश्रद्धा दुर व्हाव्यात यासाठी ते जाणीवपूर्वक कृती करतात. ते मानव बंधुत्व वेदिके या सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत.
अनेक वेळा त्यांनी स्मशान सहली काढून स्मशानात अन्न खाल्ले आहे. इतकेच नाही तर ते स्मशानात मुक्कामी राहिलेले आहेत. महाराष्ट्रात आहे तसा जादुटोणा विरोधी कायदा कर्नाटक राज्यात लागू व्हावा ,यासाठी त्यांनी सरकारवर दबाव आणला होता. इतकेच नाही तर त्यासाठी निषेध म्हणून २०१५ साली मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
कर्नाटकात हा कायदा लागू झाल्यानंतर ते त्याची प्रभावी अंमलबजावणीत अग्रेसर आहेत.ते मागील निवडणुकीत प्रचारसभा न घेता निवडून आल्याने चर्चेत आले होते.जनतेला सकारात्मक संदेश देण्यासाठी या निवडणुकीत त्यांनी फाॅर्म भरण्यासाठी अशुभ राहू काळ निवडला.चक्क स्मशानभूमीत प्रचार सभा घेतल्या व निवडून आले. त्यांचे दोघे भाऊ पण आमदार आहेत व ते स्वतः यावेळी चौथ्यांदा निवडून आले आहे.
त्यांच्या या कृतीमुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून अभिनंदन केले आहे व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमासाठी नाशिकला येण्याची विनंती केली आहे.
“आपले राजकारणी यांना उठता बसता ज्योतिषी ,बुवा-बाबा पाहिजे असतात. स्वतः अंधश्रद्धा असल्यास जनतेला ते काय संदेश देणार?त्यांनी या घटनेतून बोध घेऊन अंधश्रद्धेतुन बाहेर पडले पाहिजे. ”
– कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस
Karnataka Election Satish Jarkiholi Superstition