इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चन्नागिरी येथील भाजप आमदार के मदल विरुपक्षप्पा यांना कर्नाटकात अटक करण्यात आली आहे. त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून त्यांची अटक जवळपास निश्चित मानली जात होती. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान लोकायुक्तांच्या वकिलांनी जामीन अर्जावर जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळला. आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
लोकायुक्तांच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने काही दिवसांपूर्वी आमदार पुत्र प्रशांत मदल याला ४० लाखांची लाच घेताना अटक केली होती. प्रशांत मदल याला त्यांच्या कार्यालयातून लाच घेताना लोकायुक्त अधिकार्यांनी रंगेहात पकडले. भ्रष्टाचार शाखेने भाजप आमदाराच्या कार्यालयातून १.७ कोटी रुपये आणि त्यांच्या घरातून सुमारे सहा कोटी रुपये जप्त केले आहेत. लोकायुक्तांकडे लाच मागितल्याची तक्रार आली होती. लोकायुक्तांच्या या कारवाईनंतर मदल विरुपक्षप्पा यांनी कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेडच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
मदल विरुपक्षप्पा हे दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी मतदारसंघातून सलग दोन वेळा आमदार आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रतिज्ञापत्रात 5.73 कोटी रुपयांच्या संपत्तीचा खुलासा केला होता. 2013 च्या निवडणुकीत त्यांनी 1.79 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.
कर्नाटकात या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत लोकायुक्तांची कारवाई चर्चेचा विषय बनली आहे. भाजप आमदाराच्या मुलावरील ही कारवाईही निवडणुकीचा मुद्दा बनली आहे. यावरून काँग्रेस आणि आप दोन्ही पक्ष भाजपवर हल्लाबोल करत आहेत.
https://twitter.com/ANI/status/1640357276249739266?s=20
Karnataka BJP MLA Arrested Bribe Case