नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याला ३ हजार रुपये हमी भाव द्या..कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी यासाठी महाविकास आघाडीतर्फे नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व पाच माजी आमदारांनी करत राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आलेला असतांना केंद्र व राज्य सरकारला मात्र शेतकऱ्यांशी देणे घेणे नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोर तब्बल दोन तास हे रास्ता – रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात केंद्र व राज्य सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात कांदा उत्पादक शेतकरी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..