लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात आज कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून गेल्या आठवड्यात कांद्याला प्रति क्विंटल सरासरी २५०० रुपये भाव मिळत होता त्यात तब्बल १३०० ते १५०० रुपये पर्यंत घसरण होऊन आज कांद्याला सरासरी १००० ते १२०० इतकाच भाव मिळत आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत कांदयाला किमान प्रति किलो ३० रुपये भाव देण्याची मागणी केली अन्यथा मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला. महाराष्ट्र सोबत इतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणात कांदा पिकाला असून आवक जास्त तर मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे भावात घसरण झाली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.