नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याला राज्य सरकारने तीनशे रुपये प्रतिक्विंटल हे अतिशय तुटपुंजे अनुदान जाहीर केले असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सरकारने अनुदानाची रक्कम वाढवून द्यावी आणि कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार रुपये हमीभाव जाहीर करावा यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी मागणी केली आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कांद्याला उत्पादन खर्च २००० ते २२०० रुपये प्रति क्विंटल इतका येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विधिमंडळात कांद्याला प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेसह अनेक शेतकरी संघटनांनी व विरोधी पक्षांनी कांद्याला अनुदान तसेच हमीभाव मिळावा यासाठी राज्यभर आंदोलने केले होते. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव तसेच कवडीमोल दराने विकल्या गेलेल्या कांद्याला प्रति क्विंटल पंधराशे रुपये अनुदान मिळावे यासाठी जोरदार पाठपुरावा करण्यात आला होता असेही त्यांनी सांगितले.