मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आज कांद्याच्या प्रश्नांवरुन सुरु झाली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पाय-यावर कांद्याच्या माळा घालत कांद्याला भाव मिळालाच पाहिजे यासह अनेक घोषणा दिल्या. त्यानंतर सभागृहातही कांदा प्रश्नांवरुन गदारोळही झाला. सोमवारी लासलगाव, नांदगाव व नाशिकमध्ये कांदा प्रश्नांवरुन आंदोलन झाले. त्यानंतर आज त्याचे पडसाद पडले. यावेळी सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरी द्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.