सप्तशृंगगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे घटनेत विश्वस्त संस्थेच्या सुरक्षा यंत्रणेला इजा पोहचविणे तसेच दानपेटीतून चलनी नोटांची चोरी करण्याची वस्तुस्थिती विचारात घेता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे सुरक्षा कर्मचारी सोमनाथ हिरामण रावते (वय ३० वर्ष) यांचे विरुद्ध शनिवारी कळवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या गुन्हाचा पुढील तपास कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश निकम करत आहेत.
सदर घटनेची माहिती मिळाल्यापासून त्वरीतच गोपीनिय प्रकारात दि. १३/०२/२०२३ पासून तपास प्रक्रिया सुरू करून घटने संबंधित सर्व पुरावे व तपशील सादर करून निर्धारित केलेल्या प्रक्रिये प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेत कोणतीही दानपेटी फोडलेली नसून सर्व दानपेटी या सीलबंद व सुस्थितीत असल्याचेही सांगण्यात आले.
याबाबत संस्थेने दिलेली माहिती अशी की, आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे श्री भगवती मंदिर परिसरातील विश्वस्त संस्थेने भाविक व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कार्यान्वित केलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे कॅमेरे यांची दिशा व दानपेटी असलेल्या परिसरात काहीतरी छेडछाड तसेच ठिकाणी जळालेल्या नोटा प्राप्त झाल्याची तक्रार सुरक्षा विभागाने दि. १३-०२-२०२३ रोजी व्यवस्थापनाकडे सादर केली. वरिष्ठ अधिकारी वर्गाने मंदिर परिसरात प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देवून नोंदविलेले निष्कर्ष व गोपीनिय प्रकारात सुरू केलेली चौकशी प्रक्रियेद्वारे निदर्शनास आल्या प्रमाणे सदर ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेचे कॅमेरे हलविले होते, कॅमेराच्या समोर चुना लावलेला होता तसेच जळालेल्या नोटा घटनास्थळी आढळून आल्या. मात्र कोणत्याही दानपेटीची फोडतोड झालेली नव्हती तसेच सील सलामत होते.
त्यानुसार श्री भगवती मंदिर परिसरातील इतर व घटनास्थळी किमान दर्शनीय भागाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दि. १३/०२/२०२३ पासून दि. ०२/०३/२०२३ पावेतो केलेल्या गोपीनिय तपासणी अंतर्गत अध्यक्ष व विश्वस्त मंडळाकडे प्रत्यक्ष प्रकारात सादर केलेल्या अधिकृत तपशीलानुसार व त्याअंतर्गत उपलब्ध झालेले निष्कर्ष बाबत अध्यक्ष व विश्वस्त मंडळाच्या प्राप्त सूचनेप्रमाणे श्री भगवती मंदिरात महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे कार्यरत सुरक्षा रक्षक यांनी दि. १२.०२.२०२३ रोजी रात्री ९.०० वाजे पासून दि. १३.०२.२०२३ रोजी पहाटे ५.०० वाजे दरम्यान श्री भगवती मंदिरातून रोपवेकडे बाहेर पडण्याच्या मार्गावर असलेल्या दोन विविध दानपेटीतून काठीच्या सहाय्याने चलनी नोटा काढण्याचा प्रयत्न केला तसेच काही चलनी नोटा काढण्यास यशस्वी होवून दानपेटीतून रक्कम चोरली आहे. त्यापूर्वी त्याने परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चुना लावून, त्याची दिशा बदलून सदरची चोरी केली आहे. सदरचा कर्मचारी हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या अखत्यारीतील असल्याने घटनेच्या संबंधित उपलब्ध तपशील हे सुरक्षा महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी यांकडे सादर करून उचित कारवाई करण्याचे निर्देश विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने दिले आहेत.