नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कळवण- दिंडोरीरोडवर मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या मद्य तस्कराला अटक करुन ९ लाख ४९ हजारांचा मद्यसाठा जप्त केला आहे. या तस्करीत मद्य वाहतुकीसाठी थेट पिकअप वाहनात चोरकप्पा बनल्याचे समोर आले आहे. या वाहनाची तपासणी केल्यानंतर अगोदर पथकाला काहीच आढळून आले नाही. त्यामुळे चुकीची माहिती मिळाल्याचे त्यांना वाटले. पण, त्यानंतर पुन्हा तपासणी केल्यानंतर पिकअपच्या ट्रॉलीचा आकार इतर वाहनांपेक्षा मोठा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर चालक सुरेश कुमार रामलाल बिश्रोई याची कसून चौकशी करुन ट्रॉलीची पाहणी केल्यानंतर हा चोरकप्पा समोर आला.
या कारवाईबाबत मिळालेली माहिती अशी की, कळवणच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांना एका वाहनातून अवैध मद्य वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कळवण विभाग आणि दिंडोरी भरारी पथकाने कळवण वणी दिंडोरी रोडवर संशयित वाहनाचा शोध घेतला. त्यानंतर वणी परिसरात एका पिकअप वाहनाची तपासणी केल्यानंतर ही तस्करी समोर आली. कळवण विभाग व दिंडोरी भरारी पथकाने संयुक्तरित्या ही वाहन तपासणी केली. त्यानंतर तस्करी समोर आली.
पथकाने महिंद्रा कंपनीचे बोलेरोसह परराज्यातील विदेशीमद्यसाठा जप्त केला असून सुरेश कुमार रामलाल बिश्नोई याला गजाआड केले आहे. सदर कारवाई निरीक्षक एस. के. सहस्त्रबुध्दे, दुय्यम निरीक्षक एम.बी. सोनार, एस. व्ही. देशमुख, जवान सर्वश्री. दिपक आव्हाड, विलास कुबर, एम.सी. सातपुते. पी. एम. वाईकर, व्ही. आर. सानप, गणेश शेवगे, सचिन पोरजे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा तपास एस.के. सह निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक हे करीत आहेत.