नाशिक – कोविड १९ साथरोगाचा प्रतिकार करण्यासाठी आरोग्य सेवक दिवसाची रात्र करत आहे. या महामारीशी दोन हात करत असतांना आरोग्य सेवकांची ढाल असलेल्या पीपीई किटचा मात्र सर्वत्र तुटवडा जाणवत आहे. असे असतांना मंत्रालयाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये कार्यरत असलेले तसेच राज्याच्या कोविड नियंत्रण कक्षातील कळवण चे भूमिपुत्र अमित कोठावदे यांनी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या सामाजिक दायित्व निधी (सीएसआर)तून उपजिल्हा सामान्य रुग्णालयाला दोन हजार पीपीई किट व Dozee स्टार्टअप च्या कोविड रुग्णांच्या निरीक्षणसाठी अत्याधुनिक नावीन्यपूर्ण प्रणालीची सुविधा कळवण प्रशासनास उपलब्ध करून दिली आहे.
कळवणच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभगीय अधिकारी विकास मीना यांच्याशी अमित कोठावदे यांनी संवाद साधल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आरोग्य सेवकांना पीपीई किटची आवश्यकता आहे. तसेच इतर समस्यांचा विचार करून विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविल्यास तालुका प्रशासनास मदत होऊ शकेल. आपण आपल्या गावाचं देणं लागतो या भावनेतून तालुक्याला मदत करावी असा विचार कोठावदे यांचा मनात आला.
त्यांनी तत्काळ कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या व्यवस्थापनाने देखील मदत करण्याचे मान्य केले आणि तत्काळ २००० पीपीई किटची मदत अमित कोठावदे यांच्या माध्यमातून तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत सुपूर्द केली.
Dozee स्टार्टअपच्या माध्यमातून कोविड रुग्णांच्या निरीक्षणसाठी अत्याधुनिक नावीन्यपूर्ण प्रणाली
भारतीय स्टार्टअपच्या माध्यमातून डोझी कंपनीने अत्याधुनिक प्रणालीचा शोध लावला आहे. रिमोट मोनिट्रिंग पद्धतीच्या माध्यमातून रूग्णाजवळ न जाता ठराविक अंतरावरून विविध वैद्यकीय बाबींची माहिती मिळवून व रुग्णावर लक्ष ठेवणे शक्य होते. याची अंमबजावणी उपजिल्हा सामान्य रुग्णालय कळवण येथे सुरू करण्यात आली आहे. या अत्याधुनिक नावीन्यपूर्ण उपकरणाने सुसह्य असलेल्या पन्नास बेड साठीची सुविधा तालुक्याला मिळाल्याने रुग्णव्यावस्थेला आणखी बळ मिळाले आहे.
सदर प्रकल्पांसाठी विविध समन्वयासाठी कळवणचे भूमिपुत्र, राष्ट्रीय युवा पुरस्कारथी व सध्या मंत्रालयात कार्यरत असलेले विनीत मालपुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य कर्मचारी स्वताच्या जीवाची पर्वा न करता कोविड बाधित रुग्णांना सेवा देत आहेत. त्यांच्यामुळे अनेकजण कोरोनामुक्त होत आहेत. किंबहुना अनेकांचा प्राण वाचवत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य सेवकांना पीपीई किट आवश्यक आहे. तसेच या अत्याधुनिक नावीन्यपूर्ण प्रणालीच्या वापरामुळे आरोग्य यंत्रणेवरचा भार कमी होण्यासाठी मदत होईल तसेच येणाऱ्या काळात जी काही मदत करणे शक्य होईल तेवढी आम्ही करू अशी भावना अमित कोठावदे आणि विनीत मालपुरे यांनी यावेळी व्यक्त केली.