ज्येष्ठा गौरी पूजन महात्म्य
अनेक कुटुंबांमध्ये गणपती बरोबर चौथ्या दिवशी ज्येष्ठा गौरींचेही आगमन होते. ज्येष्ठा गौरींचे पूजन तीन दिवस केले जाते. यंदा १२ तारखेला ज्येष्ठा गौरींचे आगमन आहे. १३ तारखेला ज्येष्ठा गौरींचे पूजन व महानैवेद्य आहे. १४ तारखेला गौरी विसर्जन आहे..
ज्येष्ठा गौरी पूजन विधी व साहित्य
(गणपतीसाठी जे पूजा साहित्य आपण आणतो, तेज पूजा साहित्य ज्येष्ठागौरी पूजनासाठी लागते.) १२ तारखेला अर्थात पहिल्या दिवशी ज्येष्ठा गौरींचे आगमनाच्या दिवशी दोन गौरींचे मुखवटे घराच्या परिसरात मिरवून आणतात. त्यामध्ये एक मुखवटा घरातच सात गोपद्म काढून त्यावरुन ठेवतात. “गौराई आली सोन्या रुपयाची पावलं” असे म्हणत घंटी वाजवत घरातली गौरीचा मुखवटा उंबरठ्यापर्यंत आणतात. त्याच पद्धतीने बाहेरील गौरीचा मुखवटा सात गोपद्म वरून मिरवत बाहेरून उंबरठ्यापर्यंत आणतात. उंबरठ्यावर दोन्ही गौरींची भेट घडवली जाते. अक्षता वाहिल्या जातात. घंटानाद करत दोन्ही गौरी मुखवटे आणून स्थानापन्न केले जातात. कुटुंबात उभ्या गौरी बसवायची पद्धत असल्यास गौरी मुखवटे यांना काठापदराची साडी, ब्लाउज पीस, दागिने, मुकुट, हार असा सर्व साज घालून सुशोभित केले जाते. आजूबाजूला दिव्यांची तसेच फुलांच्या माळा यांची आरास केली जाते. दोन्ही गौरींची खणा-नारळाने ओटी भरली जाते. त्यांची बाळे या रूपाने झबले-टोपडे घातलेले बाळांचे छोटे पुतळे ठेवले जातात. गौरी आगमन झाल्यावर गोडाचा नैवेद्य दाखवून पहिल्या दिवशी दुपारी व रात्री नैवेद्य दाखवून आरती केली जाते.
दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ तारखेला दुपारी घरातील गणपती दोन्ही ज्येष्ठ गौरीच्या मध्ये स्थानापन्न केला जातो. अशा पद्धतीने भाऊ बहीण यांची भेट घडवली जाते. गणपती तसेच ज्येष्ठागौरीची षोडशोपचारे पूजा करून दुर्गा कवच, सप्तशती पाठ, श्री सूक्त पाठ तर काही ठिकाणी नवचंडी, शतचंडी विधी केला जातो. त्यानंतर आरती करून महाप्रसाद नैवेद्य दाखवला जातो. रात्री देखील आरती व प्रसाद झाल्यावर देवीचा जागर केला जातो…
तिसऱ्या म्हणजे गौरी विसर्जनाच्या दिवशी १४ तारखेला दुपारी गौरीची आरती करून कानवल्याचा नैवेद्य दाखवल्यावर “पुढील वर्षी देखील अशाच सोन्या रुपयाच्या पावलांनी यावे “असे ज्येष्ठा गौरींना आवाहन करावे. गौरीवर अक्षता टाकून गौरींचे मुखवटे थोडेसे हलवले जातात. यालाच गौरींचे विसर्जन म्हणतात.

व्हॉटसअॅप – 9373913484