मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे भारतीय संविधानातील अतिशय महत्त्वाचे आणि उच्च पद आहे. देशातील अनेक नामवंत कायदे तज्ज्ञांनी आतापर्यंत देशाचे सरन्यायाधीश म्हणून धुरा सांभाळली आहे. आता सिंधुदुर्गचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय लळीत हे देशाचे ४९ वे सरन्यायाधीश झाले आहेत. आज त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
हायप्रोफाईल केसमध्ये सहभाग, विशेष सरकारी वकील, न्यायमूर्ती आणि आता सरन्यायाधीश अशी उदय लळीत यांची ओळख आहे. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात हायप्रोफाईल प्रकरणे चालवली. मात्र ते प्रसिद्धीपासून दूर आहेत. ८० हजार पानांच्या कागदपत्रांचा डोंगर सांभाळत त्यांनी 2G स्पेक्ट्रम हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार खटला चालवला. एवढेच नाही तर सीबीआय, ईडीच्या वतीने अभियोगाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.
विशेष म्हणजे न्यायमूर्ती लळीत हे देवगड तालुक्याचे सुपुत्र असून गिर्ये ‘कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे. कुलदेवता नृसिंह लक्ष्मीचे मंदिर येथे आहे. आताही आठ ते दहा लळीत कुटुंबिय या गावात वास्तव्य करत आहेत. सुमारे २०० वर्षांपूर्वी काही लळीत कुटुंबीय कुंभवडे, पेंढरी, ‘हरचेरी चुना-कोळवण तसेच रायगड जिल्ह्यातील रोह्याजवळ आपटे या गावांमध्ये स्थलांतरित झाले. लळीत यांचे आजोबा, चार काका, वडील वकिली करायचे. मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर उदय लळीत यांनी दिवंगत ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्षे वकिली केली. नंतर ते दिल्लीला गेले. सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधीज्ञ सोली सोराबजी यांचे सहकारी म्हणून काम केले.
सर्वोच्च न्यायालय ही भारताची सर्वोच्च न्यायिक संस्था आहे. भारतीय संविधानानुसार हे भारतीय प्रजासत्ताकाचे सर्वोच्च न्यायालय आहे. तसेच हे सर्वात वरिष्ठ घटनात्मक न्यायालय असून महत्वाचे म्हणजे याला न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार आहे. सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. या न्यायालयात जास्तीत जास्त ३४ न्यायाधीश असतात आणि त्यांना प्रारंभिक, अपीलीय आणि सल्लागार अधिकार क्षेत्राच्या स्वरूपात व्यापक अधिकार असतात. न्यायदानाचा ४५ वर्षांहून अधिक अनुभव असणारे आणि संवैधानिक प्रकरणांचे जाणकार एन व्ही रमणा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सरन्यायाधीश पदाची जबाबदारी न्यायमूर्ती लळित यांच्याकडे आली आहे.
Justice Uday Lalit Home Town Life Journey Supreme Court CJI
Advocate to CJI Marathi Kokan Sindhudurg