नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतासह जगभरातील नामवंत वास्तुविशारदांसाठी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या जेके आर्किटेक्ट ऑफ द इयर या पुरस्काराची घोषणा नाशिकमध्ये आज राणा प्रताप सिंग, प्रशासक- जेके सिमेंट लि. यांच्या उपस्थितीत करण्यात आली. देशविदेशातील सुमारे २८५ प्रवेशिकांमधून वेगवेगळ्या श्रेणीतून ११ जणांना पुरस्कार घोषित करण्यात आला.
वास्तुकला व्यवसायातील उत्कृष्ट प्रतिभावंतांना त्यांनी समाजाच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. जे के सिमेंटचे डॉ. राघवपत सिंघानिया यांच्या मार्गदर्शनाखाली सलग 32 वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येत आहे. हा पुरस्कार केवळ भारतातीलच नव्हे तर शेजारील देशांतील वास्तुशास्त्रीय गुणवत्तेचा मानकरी ठरला आहे. केवळ गुणवत्तेनुसार ज्युरींच्या निर्णयानुसार बक्षिसे दिली जातात. सर्वोच्च पुरस्कार तीन वर्षातून एकदा “ग्रेट मास्टर्स अवॉर्ड” किंवा “चेअरमन अवॉर्ड” या सन्मानांतर्गत आजीवन योगदानासाठी दिला जातो. भारतातील प्रवेशिका आर्किटेक्ट ऑफ द इयर अवॉर्ड, कमेंडेशन अवॉर्ड्स (4 श्रेणी) आणि यंग आर्किटेक्ट अवॉर्ड या श्रेणीतील होत्या.
राज्यांमधून आलेल्या प्रवेशिका स्टेट आर्किटेक्ट ऑफ द इयर अवॉर्ड, कमंडेशन अवॉर्ड आणि यंग आर्किटेक्ट्स अवॉर्ड या श्रेणीत होत्या. दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंड ही पात्र राज्ये होती. फोकस देशांतील प्रवेशिका आर्किटेक्ट ऑफ द इयर अवॉर्ड, कमेंडेशन अवॉर्ड आणि यंग आर्किटेक्ट्स अवॉर्ड या श्रेणीतील होत्या. बांगलादेश, भूतान, केनिया, मालदीव, मॉरिशस, नेपाळ, सेशेल्स, श्रीलंका, टांझानिया आणि युगांडा हे फोकस देश आहेत. विविध श्रेणींमध्ये आलेल्या एकूण २८५ प्रवेशिकांचे प्रदर्शनही हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे भरविण्यात आले होते. त्यांचे विस्तृत मूल्यमापन आणि छाननीनंतर, 32व्या जेके आर्किटेक्ट ऑफ द इयर विजेत्यांची निवड करण्यात आली.
शाओन सिक्ता सेनगुप्ता (मुंबई ), पी एन मेदाप्पा (बंगलोर ), स्मित व्यास (अहमदाबाद ), विक्रम हुंडेकर (पुणे), संजय पुरी (मुंबई ), शीमुल जव्हेरी काद्री (मुंबई ), प्रभूल मॅथ्यू (कोट्टयाम ), सिद्धार्थ तलवार (नवी दिल्ली ), वीरेंद्र वखलू (नवी दिल्ली), पलिंडा कन्ननगरा (श्रीलंका ), कसून सी परेरा (श्रीलंका ) या वस्तूविशारदाना वेगवेगळ्या श्रेणीतील जेके आर्किटेक्ट ऑफ द इयर पुरस्कार घोषित करण्यात आले . शहरातील आर्किटेक्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी येथील प्रदर्शनाचा लाभ घेतला . जगाच्या विविध भागांतील ज्युरी सदस्यांनी आर्किटेक्चरच्या क्षेत्रातील त्यांचे अनुभव आणि समाजासाठी नवकल्पना आणि शाश्वतता याबद्दल विचार मांडले. पुरस्कार घोषणेच्या कार्यक्रमास शहरातील अनेक नामांकित वास्तुविशारद उपस्थित होते.
JK Architect of the Year Award Declared