इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जिओब्लॅकरॉक ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड (जियोब्लॅकरॉक ब्रोकिंग) यांना भारतात ब्रोकरेज फर्म म्हणून कार्य करण्यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाची (सेबी) अधिकृत मान्यता मिळाली आहे.
जिओब्लॅकरॉक ब्रोकिंग हे जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडची पूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी असून भारतीय गुंतवणूकदारांसाठी परवडणाऱ्या, पारदर्शक आणि तंत्रज्ञान-सक्षम गुंतवणूक व्यवहार सेवा (execution capabilities) उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
अलीकडेच जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स यांना अनुक्रमे म्युच्युअल फंड बाजारात प्रवेश व गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करण्यासाठी नियामक मंजुरी मिळाली होती. आता ब्रोकिंग परवानगीमुळे जिओब्लॅकरॉक संयुक्त उपक्रम भारतीय गुंतवणूकदारांना व्यापक गुंतवणूक उपाय (investment solutions) प्रदान करू शकेल.
जिओब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क पिलग्रेम म्हणाले, “ब्रोकिंगला सेबीकडून मंजुरी मिळाल्यामुळे आम्ही अतिशय आनंदित आहोत. यामुळे भारत ‘बचतीचा देश’ न राहता ‘गुंतवणुकीचा देश’ बनेल, यामध्ये आम्ही आमचा वाटा उचलू शकू. जिओब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्सच्या माध्यमातून आम्ही किरकोळ गुंतवणूकदारांना वैयक्तिक सल्ला देऊ, तर ब्रोकरेज व्यवसायाद्वारे आम्ही एक अत्याधुनिक व्यवहार प्लॅटफॉर्मही तयार करू.”
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश सेठिया म्हणाले, “हा आमच्यासाठी खूपच उत्साहवर्धक काळ आहे. एका बाजूला जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट म्युच्युअल फंड बाजारात उतरण्याची तयारी करत आहे, जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स सुरू होत आहे आणि दुसऱ्या बाजूला ब्रोकिंग युनिटसाठी मिळालेली ही मंजुरी आमच्या एकूण रणनीतीत एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सहज उपलब्ध आणि डिजिटल-फर्स्ट सोल्यूशन्सद्वारे भारतात गुंतवणुकीला लोकशाही स्वरूप देणे हेच आमचे ध्येय आहे.”
ब्लॅकरॉकच्या इंटरनॅशनल हेड रेचेल लॉर्ड म्हणाल्या, “भारतभरातील लाखो गुंतवणूकदारांना भांडवली बाजारात प्रवेश मिळावा, तसेच त्यांना परवडणारी आणि नाविन्यपूर्ण गुंतवणूक साधने उपलब्ध करून देण्यासाठीच जियोब्लॅकरॉकची स्थापना झाली आहे. सेबीकडून मिळालेली ही तिसरी मंजुरी आमच्या संयुक्त उपक्रमाच्या उत्पादन श्रेणीला पूर्ण करते. या तीनही संस्थांच्या माध्यमातून, जिओब्लॅकरॉक एक परिपूर्ण गुंतवणूक सेवा संच (comprehensive suite) भारतीय गुंतवणूकदारांना देऊ शकेल, ज्यामुळे ते त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांकडे ठामपणे वाटचाल करू शकतील.”
००००