नाशिक – भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन समारंभ देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात सर्वधर्मियांचे योगदान हे महत्वाचे असून अनेक धर्म, भाषा, संस्कृतीचा वारसा लाभलेल्या आपल्या देशाची सांस्कृतिक परंपरा आजही आबाधित आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर धर्मदाय सह- आयुक्त टी. एस अकाली, सरदार जसकंवलपाल सिंग बीर (IRS), अपर जिल्हाधिकरी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, गणेश मिसाळ, निलेश श्रींगी, तहसिलदार प्रशांत पाटील यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच टी.आर चावला, सरदार सुरिंदर सिंगलाल सिंग कोच्चर, कुलदिप सिंग नानक सिंग ग्रोवर, अर्जूनसिंग खानचंद हिरानी, मीरा नंदलाल ग्यानचंदानी, मोहिनी चीमदास बलानी, सोमोमल चुमहरमल नागदेव, पद्मा कन्हैयालाल बुधवाणी या मान्यवरांसह शीख, पंजाबी व सिंधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. पुढे म्हणाले की, १४ ऑगस्ट, १९४७ रोजी झालेल्या फाळणी दरम्यान हजारो लोकांचे स्थलांतर झाले. त्यांना ज्या यातना झाल्या, मन:स्ताप आणि दु:ख भोगावे लागले त्याची कल्पना यावी या दृष्टिने १४ ऑगस्ट, २०२२ हा दिवस ‘फाळणी दु:खद स्मृती दिन म्हणून पाळण्यात यावा याविषयीची घोषणा माननीय पंतप्रधान यांनी गत १५ ऑगस्ट ला लाल किल्ल्यावरून केली होती. त्याला अनुसरून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज ‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’ आयोजित करून विविध उपक्रमातून फाळणी च्या दु:खद स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे, अशा भावना यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमांचे प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ म्हणाले की, आज 14 ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’आयोजित केला आहे. देशाच्या इतिहासात याच दिवशी झालेल्या भारत -पाकिस्तान विभाजन व या विभाजनातून त्यावेळी आपल्या पूर्वजांनी भोगाव्या लागलेल्या यातना, दु:ख याबाबत नवीन पिढीला ज्ञात व्हावे हाच आयोजित कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश हाच आहे. या विभाजनात सुमार दोन कोटी लोकांचे विस्थापन झाले होते. गतकाळातील स्मृतींना उजाळा देत यातून भावी पिढीने चांगल्या गोष्टींचा बोध घ्यावयाचा आहे. आपण सर्व भारतीय स्वातंत्र्याचा 75 वर्धापन दिन समारंभ एकत्र येवून साजरा करूया! असे बोलून उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या.
आज आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’ निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात श्री.गुरू गोविंद सिंग पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज व सिंधू सागर शिक्षण मंडळव आर. के. कलानी ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षकवृंद सहभागी झाले होते. यानंतर विभाजन विभिषीका दृष्य बोर्डचे आनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सभागृहातील कार्यक्रमाची सुरवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमात श्री. गुजर स्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य हसानंद ओचीराम नेहल्पानी यांनी फाळणी- वेदना, अर्थव्यवस्था आणि संस्कृती या विषयावर तर सरदार एस कुविंदर सिंग गुजराल, टि.आर चावला व सागर अकॅडमीचे सचिव अर्जूनदास खानचंद हिराणी यांनी ‘दास्तान ए- विभाजन’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात डॉक्टर गुजर सुभाष इंग्लिश स्कूल देवळालीच्या विद्यार्थांनी देशभक्तिपर नृत्य सादर केले. यात श्री.गुरू गोविंद सिंग पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विभाजन वेदना गीत व अभिनयातून सादर केली तर सिंधू सागर शिक्षण मंडळव आर के कलानी ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थ्यांनी फाळणी मधील काही महत्वपूर्ण व्यक्तीं व घटना अभिनयातून व व्हिडीओतून सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती तेजश्री कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाच्या अयोजनासाठी उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी यांनी विशेष परिश्रम घेतले असून त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमांची सांगता सामुहिक राष्ट्रगीताने झाली.