नाशिक : जिल्हा रूग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेस रूग्णालयीन कर्मचा-याने मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीनंतर प्रसूतीनंतर महिलेचे बाळ दगावल्याने पीडित महिलेच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त करत जिल्हा शल्यचिकीत्सक आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यात मुजोर कर्मचा-यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. रूग्णालयाने या घटनेची दखल घेत कारवाईची ग्वाही दिल्याने तब्बल आठ तास पडून असलेल्या बालकाचा मृतदेह कुटुंबियानी ताब्यात घेतला.
पेठ येथील हिरा कैलास गारे या गर्भवती महिलेस मंगळवारी (दि.९) रात्री अचानक प्रसूत कळा सुरू झाल्या. त्यानंतर कुटूंबियांनी तिला पेठ येथील शासकिय रूग्णालयातून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. पहाटे चार वाजेच्या सुमारास पोटात सुरू असलेल्या कळा असह्य झाल्याने ती वार्डातील बाथरूमच्या दिशेने जात असतांना सफाई कर्मचा-याने तिला अडविले. यावेळी संतप्त कर्मचा-याने शिवीगाळ करीत तिला भिंतीवर ढकलून दिले. एवढ्यावरच न थांबता संबधीताने तुझ्यावर केस करुन तुरुंगात पाठवेन आणि तेथेच प्रसूती केली जाईल. असे म्हणत तिच्या कानशिलेत वाजवली. या घटनेत भिंतीवर ढकलून दिल्याने पीडिता खाली पडून तिच्या पोटाला मार लागला होता. दुस-या दिवशी सकाळी पीडिता प्रसूत झाली. यावेळी डॉक्टरही उपस्थित नव्हते. अशा हलगर्जीपणामुळे बाळाच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे त्यास एसएनसीयू विभागात ठेवण्यात आले होते. मात्र त्याचाही मृत्यु झाला.