जायखेडा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ताहाराबाद गावाजवळ जायखेडा पोलिसांनी सापळा लावून ६ लाख ७५ हजाराचा गुटखा, पानमसाला जप्त केला आहे. अवैधरित्या वाहतूक करणा-या महिंद्र जीतो कंपनीचे चार चाकी वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सकाळी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला पानमसाला गुटखाची अवैधरित्या वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. त्यानंतर पिंपळनेर कडून सटाणाकडे जात असलेल्या गाडीची तपासणी केली. त्यात पाठीमागे शेतमालाचे प्लास्टिक कॅरेट ठेवून चोरटी वाहतूक करत असल्याचे आढळले. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी याबाबतची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार यांना दिल्यानंतर त्यांनी पोलिस स्थानकात तक्रार दिली. त्यानंतर वाहतूक करणारे धुडकु पांडुरंग अहिरे, रा. नांदगाव, अनिल पंढरीनाथ अहिरे, रा. पिंपळनेर ता.साक्री यांच्याविरुध्द जायखेडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. जायखेडा पोलिसांनी आठवड्यात लागोपाठ तिस-यांदा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला पानमसाला गुटखा वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई केल्याने अवैधरित्या प्रतिबंधित गुटखाची चोरटी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.