मुंबई – शिंदे गटाला काही तरी जास्त आवडणारे मिळाले म्हणून उध्दव ठाकरे अचानक नावडते झाले अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. शिंदे गटात जाण्याची प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे. कुणाला कशाची भीती आहे याची माहिती लोकांना आहे. तुम्ही जर गावखेड्यात गेलात तर लोक शिंदे गटाबाबत काय चर्चा करत आहेत याची कल्पना येईल असेही जयंत पाटील म्हणाले. शिवसैनिकांनी कधीच निष्ठा बदलली नाही… निष्ठा न बदलणारा म्हणजेच शिवसैनिक. आजघडीला सर्व शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहेत. काही लोक फक्त इकडे- तिकडे झाले आहेत मात्र खरा शिवसैनिक अजून तळ ठोकून आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
सोनिया गांधी यांच्या चौकशीत मानवतावादी दृष्टीकोन ठेवायला हवा
सध्या ईडी, सीबीआय, आयटी मार्फत चौकशी होणे हे नित्याचे झाले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या देशातील मोठ्या नेत्या आहेत. त्यांचे वय पाहता, प्रकृती पाहता ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जावून चौकशी करायला हवी होती. राजकारण होत राहील मात्र मानवतावादी दृष्टिकोन ठेवायला पाहिजे असेही जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी पक्षात कोणतीही गळती नाही
माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर बोलताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शासन आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे कामे घेऊन जात असतात. त्यात गैर काहीच नाही. आपल्या साखर कारखान्याच्या प्रश्नाविषयी बबन शिंदे हे उपमुख्यमंत्र्यांना भेटले तशी त्यांनी पक्षाला कल्पनाही दिली असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.