इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पेट्रोलिअम उत्पादनांवरील अवंलबित्व कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या लिथिअमचा साठा जम्मू-काश्मीरमध्ये सापडला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, लिथिअमचा हा साठा ५.९ दशलक्ष टनइतका आहे.
रियासी जिल्ह्यात ३ हजार ३८४ अब्ज किंमतीचा ५.९ दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला असल्याचा अंदाज आहे. केंद्रीय भूगर्भीय कार्यक्रम मंडळाच्या ६२ व्या बैठकीत खाण सचिव विवेक भारद्वाज यांनी देशात जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच लिथियमचा साठा सापडला असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पेट्रोलिअम पदार्थावरील अवलंबित्व कमी होऊन बॅटरीद्वारे संचालित होणाऱ्या उपकरणांसाठी लिथिअम उपयोगी ठरणार आहे.
मोबाइल असो इलेक्ट्रिक वाहन असो वा सोलर पॅनेल यामध्ये लिथियम धातू हा महत्त्वाचा घटक असतो. सध्या भारत आपल्या गरजेनुसार लिथियम आयात करतो. त्यामुळेच मोबाइल आणि ई-वाहनांच्या किमती अजूनही जास्त आहेत. परंतु, जम्मू-काश्मीरमधील लिथिअमच्या साठ्यामुळे भारताला लिथिअम आयात करावा लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
देशातील पहिलाच साठा
देशातील विविध मौल्यवान धातूंचे साठे शोधण्याच्या भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेच्या सततच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. या संस्थेला जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात लिथियमचे मोठे साठे आढळून आले आहेत. देशातील हा पहिला लिथियमचा साठा असल्याचे म्हटल्या जात आहे.
का आहे गरज?
बॅटरीची वाढती गरज आणि त्यात लिथियमचा वापर लक्षात घेता, हा साठा देशासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. लिथियम-आयन बॅटरीची क्षमता जास्त असते. इतर रासायनिक प्रकिया आधारित बॅटरीच्या तुलनेत त्यांचे जास्त आयुष्य असते. लिथियम-आयन बॅटरीमुळे इलेक्ट्रिक वाहनांची र्दा वाढविण्यात मदत झाली आहे. एका चार्जमध्ये ५०० ते ७०० किलोमीटर धावणाऱ्या कारचे उत्पादन केले जात आहे. लिथियम-आयन बॅटरीमुळे मोबाइल फोन एका चार्जवर अनेक दिवस काम करू शकतो.
https://twitter.com/MinesMinIndia/status/1623720717656420353?s=20&t=Qwfm0KvsIwhtROYZjIpoMw
Jammu and Kashmir Deposits Found Lithium Mine