जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत सर्वत्र रस्त्यांचे जाळे विणण्यात येत आहे. जालन्यातील हसता पोखरी कर्जत या रोडच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. जमिनीवर डांबरी चादर पांघरल्यासारख्या या रस्त्याने या योजनेचे पितळ उघडले पाडले असून ग्रामस्थांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
रस्त्यांच्या डांबरीकरणात मोठ्या प्रमाणात भेसळ वाढली आहे. यासाठी विविध घटकांचा उपयोग करण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकचा समावेश आहे. डांबराऐवजी प्लास्टिकचा उपयोग करून तयार झालेला रस्ता अत्यंत तकलादू असा आहे. याबाबत ग्रामस्थांनी ओरड केली आहे. प्राप्त माहितीनुसार, पॉलिथिन पन्नीचा वापर केल्याने रस्ता अक्षरशः चादरीसारखा बाहेर निघाला आहे. डांबरीकरण पॉलिथिन पन्नीसह चिटकून येत असल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघड केला आहे. त्यामुळे पंतप्रधान ग्राम सडक योजनेत दर्जाहीन काम होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
संतप्त झालेल्या नागरिकांनी अक्षरशः रस्ता हाताने चादरी सारखा उचलून त्याखाली आलेली पॉलिथिन पन्नी ही ओपन करून दाखवली आहे. यामुळे बोगस काम करून बिल काढण्यासाठी कंत्राटदारांनी लढवलेला अनोखा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी या संपूर्ण कामाची चौकशी करून दोशी गुत्तेदारासह अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कंत्राटदाराने संपविले झटपट काम
गावोगावी आणि खेड्यापाड्यात लोकांना चालण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रस्ता हवा. त्यामुळे पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत जालन्यातील हसता पोखरी कर्जत या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. कंत्राटदाराने झटपट काम संपवून टाकले. त्यामुळे गावकऱ्यांनी जेव्हा या रस्त्याची पाहाणी केली तेव्हा हा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.