जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उन्हाचा पारा कधी ४५ तर कधी ४६ पर्यंत जात आहे. उकाडा आणि घामट्याने सर्वच खान्देशवासिय हैराण झाले आहेत. अशाच या कठीण वातावरणात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच कुलरचा शॉक लागून एका चिमुरडीचा अंत झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे घडली आहे. वैष्णवी चेतन सनान्से (वय ९ वर्षे) असे मृत बालिकेचे नाव आहे. सनान्से कुटुंबिय हे प्रभाग क्रं.१२ मधील जिजाऊ नगर मध्ये राहतात. वैष्णवीचा नववा वाढदिवस असल्याने घरात अतिशय चैतन्याचे वातावरण होते. सायंकाळी हा वाढदिवस जंगी साजरे करण्याचेही नियोजन होते. खासकरुन वैष्णवी तर अतिशय उत्साहात होती. वाढदिवसाला कुणाकुणाला बोलवायचं, कोणता केक आणायचा हे सारंच ती मनामध्ये ठरवत होती. वाढदिवसाबाबत घरात चर्चा आणि तयारी सुरू होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.
जशी जशी सायंकाळ झाली तशी वैष्णवीची घालमेल आणखीनच वाढली. आता थोड्याच वेळात वाढदिवस साजरा होणार म्हणून ती प्रचंड उत्साहात होती. सायंकाळचे साडेसहा वाजले होते. त्याचवेळी वैष्णवी कुलर जवळ काही निमित्ताने गेली. आणि अतिशय हृदयद्रावक घटना घडली. वैष्णवीला कुलरचा जबरदस्त शॉक बसला. त्यामुळे वैष्णवी जागीच कोसळली. घरच्यांनी हे पाहिले आणि त्यांनाही काय करावे सूचत नव्हते. तेवढ्यात वैष्णवीला उचलून डॉक्टरकडे नेण्यात आले. पण, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून सनान्से कुटुंबावर प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.
वैष्णवी ही गोपाळ बळिराम सनान्से (रा. चिचोंल, ह. मु. मुक्ताईनगर) यांची नात होती. वाढदिवसाच्या दिवशीच काळाने तिचा घात केला. शोकाकुल वातावरणातच वैष्णवीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैष्णवी ही ओम साई सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सुभाष सनान्से यांची पुतणी तर चेतन महाराज (अंत्यविधी, भजनी मंडळ) याची कन्या होती.
Jalgaon Muktai Nagar Girl Child Death Cooler Shock