जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंजनी – पद्मालय प्रकल्पासह राज्यातील २२ प्रकल्पांना राज्य शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातील ५ लाख हेक्टर तर पारोळा व एरंडोल तालुक्यातील सात हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. पारोळा तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, पारोळा-एरंडोल तालुक्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. पारोळा व एरंडोलच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला पद्मालय प्रकल्पास ३७० कोटी व अंजनी मध्यम प्रकल्पास २३१ कोटी रूपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असल्याने हे तालुके सुजलाम् होण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, जळगाव व धुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ४३ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणाऱ्या निम्नतापी प्रकल्पाच्या गतिमानतेसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच शिवजयंतीचा उत्सव होणार ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. राज्य सरकारच्या लोकाभिमुख कामांची दखल देश व जागतिक पातळीवर घेतली जात असून विकास कामे करतांना लोकांचे प्रेम मिळत आहे. सहा महिन्यात शासनाने शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय घेतले. राज्य सरकार सर्वसामान्यांचे आहे. महाराष्ट्रातील जनता सुखी झाली पाहिजे या एकाच ध्येयाने सरकार काम करत आहे. असेही ते म्हणाले. जळगांव जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. कापसाला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन म्हणाले, राज्य शासनाने केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रातील ३८ हजार गावामध्ये हर घर जल दिले आहे. प्रत्येक गावामध्ये रस्ते, वीज, पाणी, घरे देण्याचे काम राज्य सरकार करीत आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील ३८ हजार गावांना जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या योजना दिल्या. सर्व कामे मुदतीत पूर्ण झाली. राज्य सरकारचे हे उल्लेखनीय काम आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये विकास योजनांची कामे सुरू आहेत.
आमदार चिमणराव पाटील म्हणाले, एरंडोल व पारोळा तालुक्यातील विकासकामांसाठी २१५ कोटीं रूपयांचा निधीस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
पारोळा शहर पाणीपुरवठा योजना, आधुनिक संयुक्त नाट्यगृह, जलतरण तलाव, फिश व मटन मार्केट विकसित करणे, शहरातील विविध चौक सुशोभीकरण व शहराच्या परिसरातील जोड रस्त्यांवर विद्युतीकरण करणे या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, खासदार उन्मेष महाजन, आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, किशोर पाटील, मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.
पारोळा, जळगाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व जाहीर मेळाव्यातून लाईव्ह https://t.co/WBJTw52xFe
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 16, 2023
Jalgaon District Parola and Erandol 7 Thousand Hector Area Irrigated