अमळनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात एकामागून एक हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. औरंगजेबाबाबत कोल्हापुरातील परिस्थिती अजून सुधारली नसताना बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात तणाव निर्माण झाला. आणि आता येथे दोन समुदायांमध्ये जोरदार हाणामारी झाली. एवढेच नव्हे तर दंगलखोरांनी पोलिसांनाही सोडलेले नाही. प्रकरण इतके वाढले की पोलिसांनी या परिसरात कलम १४४ लागू करावे लागले आहे.
किरकोळ वादातून हा हिंसाचार सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात एका समाजातील काही मुले भिंतीवर लघुशंका करत होते, त्याला दुसऱ्या बाजूच्या लोकांनी विरोध केला. त्यावरून वादावादी झाली आणि काही वेळातच दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये हाणामारी सुरू झाली. एवढेच नाही तर प्रकरण इतके वाढले की हाणामारी आणि दगडफेक सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही समुदायांना शांत होण्यास सांगितले असता, हल्लेखोर आणखी भडकले. त्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर दगडफेक केली.
अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. नंतर परिस्थिती लक्षात घेऊन परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले. शहरातील रस्त्यांवर पोलिसांची अनेक पथके गस्त घालत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचारात ४ पोलीस जखमी झाले आहेत. हिंसाचारात सहभागी लोकांनी मंदिर आणि दुकानांची तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिराच्या तोडफोडीच्या घटनेवरून दुसरी बाजू अधिकच संतप्त झाली आणि त्यांनी दगडफेक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आळे गल्ली आणि सराफ बाजार येथे दोन गटांत दगडफेक सुरू होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बाजूंना बोलून समजावून सांगण्यात आले. कोणत्याही भ्रामक बातम्यांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे. जर कोणी अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर तत्काळ पोलिसांना कळवा. आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Jalgaon Amalner Riot Curfew