कानपूर (उत्तर प्रदेश) – भारत मान्सूनचा म्हणजेच मोसमी हवामानाचा प्रदेश असल्याने येथे कधी अत्यंत मुसळधार तर कधी पाऊस पडत नाही. त्यामुळे यंदा किती पाऊस पडणार ? याचा हवामान खात्यालाही नेमका अंदाज येत नाही. त्यामुळे खूप पाऊस पडला तर खूप नुकसान होते आणि पाऊस पडला नाही तर कोरडा दुष्काळ पडतो.
पावसासाठी कुठे बेडकाचे लग्न लावले जाते, तर कुठे चक्क देवच पाण्यात ठेवले जाते. ग्रामीण भागात तर दरवर्षी किती पाऊस पडेल याकरिता वेगवेगळे प्रकार केले जातात. विदर्भात भेंडवळ येथे आखाजीला म्हणजे अक्षय तृतीयेला शेतात घट मांडणी करून पावसाचे भाकीत करण्यात येते. असे अनेक प्रकार या देशात चालतात.
पावसाचा अंदाज वर्तविण्याची आणखी एक प्रकार उत्तर प्रदेशात दिसून आला आहे. भिणागाव विभागाच्या बेहटा बुजुर गावात वसलेले या मंदिरात यंदा किती पाऊस पडणार ? याचा अंदाज व्यक्त केला जातो, असे म्हटले जाते. या खेड्यातील जगन्नाथाच्या मंदिराने यावेळी मान्सून कमकुवत असल्याचे संकेत दिले आहेत. पावसाळ्याच्या आगमनाच्या काही दिवस आधी मंदिराच्या घुमटातील दगडातून काही थेंब पडले की त्याच्या आकारावरून पुजारी पावसाळ्याचा अंदाज घेतात.










