नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- येथील ‘गिरणा गौरव प्रतिष्ठान’ तर्फे आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमाअंतर्गत नववर्षाच्या सुरूवातीलाच म्हणजे येत्या ३ जानेवारी, २०२५ रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारकात कवी जगदीश देवरे हे त्यांनी लिहीलेल्या ‘चुलीतले निखारे’ या काव्यसंग्रहावर वाचकांसमोर एैसपैस गप्पांच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल.
जगदीश देवरे यांच्या ‘चुलीतले निखारे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन इंडिया दर्पण प्रकाशनातर्फे करण्यात आलेले आहे. हल्ली मराठी लेखकांच्या पुस्तकांना खरेदीदार आणि वाचनालयांना वाचक मिळणे दुर्मिळ होत चाललेले असतांना नाशिकच्या गिरणा गौरव प्रतिष्ठानने ‘पुस्तकावर बोलू काही’ नावाचा उपक्रम राबवण्याचे धाडस समर्थपणे पार पाडले असून आत्तापावेतो जवळपास ९० स्थानिक लेखकांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मराठी साहित्यासाठी, मराठी लेखकांसाठी आणि वाचक वर्गासाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे.
चांगुलपणाचा गौरव केल्याने चांगले काम करणाऱ्यांचा उत्साह व्दिगुणीत होतो आणि त्यांना अधिक चांगले काम करण्याची उर्जा मिळते या विचारांचा वारसा गिरणा गौरव प्रतिष्ठान ही संस्था गेली अनेक वर्ष नाशिक जिल्हयात जपत आली आहे. या प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या गिरणा गौरव पुरस्कारांना नजिकच्या काळात एक खास अशी प्रतिष्ठेची ओळख निर्माण झाली आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ९ मार्च, २०२४ रोजी या कार्यक्रमाची सुरूवात झाली होती आणि शुभारंभालाच या कार्यक्रमाचे २८ फेब्रुवारी, २०२५ पावेतोचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार हा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे.
या उपक्रमाअंतर्गत आठवड्यातून दोनदा म्हणजे दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी ६ ते ७ वाजे दरम्यान नाशिकच्या एका लेखकाला स्वत:च्या एका पुस्तकावर बोलण्याची संधी मिळते. लेखकाला पुस्तकाची संकल्पना कशी सुचली?, पुस्तक प्रसिध्द करतांना काय अडचणी आल्या? पुस्तकाचा विषय, आशय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वाचकांसाठी पुस्तकात नवीन काय आहे? या आणि यासारख्या इतर काही मुद्यांवर लेखक प्रेक्षकांसमोर आपली भुमिका या व्यासपीठावरून मांडत असतात. एखादे पुस्तक प्रसिध्द झाल्यानंतर त्या पुस्तकाची जशी ताकद असेल त्यानुसार ते सर्वदूर वाचकांपर्यंत पोहोचतेच, परंतु त्या पुस्तकाच्या उत्पत्तीमागची लेखकाची तळमळ वाचकांसमोर व्यक्त करण्याची संधी फार कमी लेखकांना मिळते. मात्र अशी संधी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे जुने जाणते आधारस्तंभ आणि ‘माणुस मित्र’ नावाने ओळखले जाणारे सुरेश पवार आणि आणि त्यांच्या टीमच्या संकल्पनेतून साकार झाली आहे.