मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईचा अनेकांनी धसका घेतला आहे. मग ते राजकारणातील व्यक्ती असो की बॉलीवूड मधील कलाकार. ईडी कडून कोणाची चौकशी करण्यात येईल ? हे सांगता येत नाही. सध्या अनेकांची चौकशी सुरू झाली आहे. त्यातच ईडीच्या कारवाईत मोबाईल स्पुफींग हे नवे प्रकरण समोर आले आहे. ते नेमके आहे आहे याबाबत अनेक जण प्रश्न उपस्थित करीत आहेत.
आरोपपत्र दाखल
सध्या सुमारे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. वास्तविक, ईडीने या प्रकरणाशी संबंधित आरोपपत्र दाखल केले आहे, यात सध्या अशी माहिती मिळाली आहे की, बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखरच्या वतीने स्पूफ कॉल करण्यात आले होते. या कॉल्सद्वारे, बॉलिवूड अभिनेत्रीला खात्री देण्यात आली की हे कॉल गृह मंत्रालयाकडून आले आहेत. अशा परिस्थितीत आता असा प्रश्न निर्माण होत आहे की, कॉल स्पूफिंग किंवा नंबर स्पूफिंग म्हणजे काय आणि हा घोटाळा कसा केला जातो. याबाबत जाणून घेऊ या …
मोबाईल नंबर स्पूफिंग म्हणजे काय
मोबाईल नंबर स्पूफिंग ही कॉलर आयडी माहितीमध्ये फेरफार करण्याची एक पद्धत आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला विश्वास बसतो की, कॉल एखाद्या विशिष्ट व्यक्तीने किंवा ठिकाणाने केला आहे. हा घोटाळा काही नवीन नाही. कारण जगभरातील गुन्हेगार अपहरणासारख्या घटना घडवण्यासाठी या तंत्राचा वापर करतात. एवढेच नाही तर लोकांची फसवणूक करण्यासाठीही ही पद्धत वापरली जाते. मोबाईल स्पूफिंगचा वापर केवळ गुन्ह्यासाठीच नाही तर नागरिकांच्या भानगडीसाठीही केला जातो.
स्पूफिंग कॉल स्कॅम कसे कार्य करते?
VoIP आधारित सॉफ्टवेअर वापरून फसवणूक करणारे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. या पद्धतीच्या मदतीने, फसवणूक करणारा कॉलर आयडीमध्ये फेरफार करून तुम्हाला मुंबईचा लँडलाइन नंबर दाखवू शकतो, जेव्हा कॉल खरोखर यूएसमधून असेल. तसेच VoIP हे एक तंत्रज्ञान आहे जे तुम्हाला मोबाईल नेटवर्कऐवजी ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन वापरून व्हॉइस कॉल करण्याची परवानगी देते.